किन्नर समाजाला स्मशान भुमीसाठी वेगळी जागा द्या, राणी ढवळे यांची मागणी

नागपूर : नागपूरातील किन्नर समाजाने आपल्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी पुन्हा एकदा पुढे आणली आहे. किन्नर नेत्या राणी ढवळे, या महाराष्ट्र किन्नर विकास महामंडळाच्या सदस्या असून, त्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या मागणीसंदर्भात निवेदन सादर केलं.
२०२३ पासून मागणी, अद्याप प्रतिसाद नाही!
राणी ढवळे म्हणाल्या,
“आम्ही २०२३ पासून नागपूर महानगरपालिकेकडे व राज्य सरकारकडे स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करत आहोत. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.”
किन्नर समाजाच्या अंत्यसंस्कारांची वेगळी परंपरा
किन्नर समाजात अंत्यसंस्कार विशिष्ट धार्मिक विधीनुसार पार पडतात. त्यामुळे सार्वजनिक स्मशानभूमींमध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.
राणी ढवळे म्हणाल्या,
“आमच्या समाजाचा शेवटही इतरांप्रमाणे सन्मानाने व्हावा, हीच आमची मागणी आहे.”
नांदेडमध्ये मिळाली सुविधा, नागपूर का मागे?
नांदेड शहरात स्थानिक प्रशासनाने किन्नर समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची जागा दिली आहे. त्याच धर्तीवर नागपूर शहरातही अशीच सुविधा मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नागपूरात सुमारे २५० ते ३०० किन्नर
नागपूर शहरात सध्या सुमारे २५० ते ३०० किन्नर समाजाचे सदस्य राहतात. अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील गोष्टींसाठीही स्वतंत्र जागा नसणे ही सामाजिक उदासीनतेचं लक्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाकडे पुन्हा निवेदन
आज राणी ढवळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच पालकमंत्री बावनकुळे यांना लिखित निवेदनाद्वारे स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागेची मागणी केली. या मागणीला शासनाकडून लवकरात लवकर प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा समाजाने व्यक्त केली आहे.