बार्शीटाकळी रोडवर दुचाकीचा भीषण अपघात

अकोला – अकोल्याच्या बार्शीटाकळी रोडवरील शिवापुर फाट्याजवळ मंगळवारी संध्याकाळी एक दुचाकी अपघातात युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. क्रशर प्लांटकडून शहराच्या दिशेने येत असताना दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली.
अपघात इतका जबरदस्त होता की दुचाकी पूर्णतः उद्धवस्त झाली, तर चालक गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी युवकास शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाढती वाहतूक आणि बदलते हवामान लक्षात घेता नागरिकांनी वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीच्या या काळात रस्ते ओलसर असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढते.