कल्याणमध्ये भयानक दुर्घटना! इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा जागीच मृत्यू

Kalyan Saptashrungi building slab collapse : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. मान्सून पूर्व पावसामुळे कल्याणमध्ये भयानक दुर्घटना घडली आहे. कल्याणमध्ये एका धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
कल्याण पूर्व परिसरात ही दुर्घटना घडली आहे. कल्याण पूर्व परिसरात असलेल्या महाराष्ट्र नगर मधील चिकणी पाडा येथे सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. तळ अधिक चार मजल्याची ही इमारत सुमारे 40 वर्ष जुनी आहे. या इमारतीमध्ये एकूण 25 कुटुंब राहत होते. 20 मे रोजी दुपारच्या सुमारास या इमारतीच्या एका बाजूचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. पत्त्याप्रमाणे हा स्लॅब तळमजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळतात अग्निशमन विभाग आणि केडीएमसी चा पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. या इमारतीमधून चार ते पाच जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
प्रमिला साहू ( वय 58),नामस्वी शेलार(दीड वर्षाचे बाळ), सुनीता साहू (वय 37),सुजाता पाडी (वय 32), सुशीला गुजर ( वय 78) आणि व्यंकट चव्हाण (वय 42) अशी मृतांची नावे आहेत. अरुणा रोहिदास गिरणारायन (वय 48), शरवील श्रीकांत शेलार(वय 04), विनायक मनोज पाधी (साडे चार वर्ष), यश क्षीरसागर ( वय13), निखिल खरात ( वय 27), श्रद्धा साहू ( वय14) अशी जखमींची नावे आहेत.
मृतकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिलीय.. मृतकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. बचाव कार्य पूर्ण झालं आहे. या घटनेत 5 जण जखमी झालेत.. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी इश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच मृतकांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे..
दरम्यान, कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात 176 अतिधोकादायक इमारती असल्याचं उघडकीस आले आहे. पावसाळ्यापूर्वी अति धोकादायक इमारती रिकाम्या करणार असल्याचं केडीएमसी उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले. तसेच ज्या इमारती 40 वर्षाहून जुन्या आहेत. त्या इमारतींचे रहिवाशांनीच स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे आणि जर स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये या इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट होत असेल तर नागरिकांनी जीवाशी खेळ न करता या इमारती रिकाम्या कराव्यात असं आवाहन तावडे यांनी नागरिकांना केले आहे.