पोलिसांचा MD ड्रग्ज व अवैध शस्त्रांच्या साठ्यावर छापा, पोलिसानी केली NDPSकारवाई

नागपूर : नागपूर शहरातील मध्यवर्ती भागात कोतवाली पोलीस ठाण्याच्या युनिट 5 पथकाने मंगळवारी रात्री मोठी कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 90.44 ग्रॅम मेफेड्रोन (MD) ड्रग्ससह 7 लाख 41 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी NDPS आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 मे 2025 रोजी रात्री 10:59 वाजता सुरू झालेली ही विशेष कारवाई 21 मे रोजी पहाटे 2:20 वाजेपर्यंत चालली. पोलिसांनी पहिला छापा महाल परिसरातील घर क्रमांक 399, मुंशी गल्ली येथे, तर दुसरा छापा जुनी मंगळवारी परिसरातील मोहसिन इंजिनीयर वर्क्सजवळ, छगन सावजी भोजनालयाच्या बाजूला टाकला.
या कारवाईत साजिद अली उर्फ सज्जु हाफिज अली (वय 38 वर्षे) आणि शेख आमीन शेख रशीद (वय 31 वर्षे) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 90.44 ग्रॅम प्रतिबंधित मेफेड्रोन (MD) ड्रग्स, शस्त्रास्त्रं आणि इतर महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे ड्रग्स विक्रीसाठी बाळगले गेले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात NDPS कायदा आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या सतर्कतेचे आणि कठोर कारवाईचे उदाहरण आहे.