गुरुकुंजातील राष्ट्रसंतांच्या आश्रमिय परीसरात चंदन तस्करांचा धुमाकूळ

तिवसा : चंदनाची झाडे कापून त्यातील गाभा लंपास करण्याच्या उद्देशाने अज्ञात चंदन तस्करांनी गुरुकुंज आश्रमातील चंदनाच्या झाडांना लक्ष करून रात्रीच्या काळोखात चंदनाच्या झाडातील गाभा काढण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील मध्यवर्ती कार्यालयाच्या परीसरात लावण्यात आलेल्या सहा ते सात चंदनाच्या झाडांपैकी तीन झाडांना चंदन तस्करांनी लक्ष करीत आरी व कटरने कापन्या मारल्या आहे. व यातील एका झाडाला कटरच्या साहाय्याने कापून यातील गाभा काढून नेण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आला असून या प्रकरणी चंदन तस्करांचा शोध घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामण्डळ यांच्याकडून करण्यात आली आहे.
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांनी स्थापित केलेला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ सेवाभावी सस्था व आश्रम असून या आश्रमिय परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यातच सहा ते सात चंदनाच्या झाडांची सुद्धा लागवड करण्यात आली आहे त्यातीलच एका चंदनाच्या झाडांना तस्करांकडून कटरमशीनने कापून त्यातील गाभा काढून नेण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे
दरम्यान बुधवारी मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास चंदनाच्या झाडाला लक्ष करून त्यातील गाभा काढून नेण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामण्डळ अंतर्गत तिवसा पोलीस अथवा वन विभाग यांच्याकडे याप्रकरणी अद्याप तक्रार नोंदविण्यात आली नसल्याचे बोलल्या जात आहे.
रात्र पाळीत आहे सुरक्षा रक्षक
अज्ञात चंदन तस्करांनी ज्या ठिकाणी चंदन तस्करी केली ते आश्रमिय परिसरातील मध्यवर्ती कार्यालयातील ठिकाण अत्यन्त गजबजलेला परिसरातअसून येथून हाकेच्या अंतरावरच मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन सुरक्षा रक्षक रात्र पाळीत तैनात करण्यात आले आहे.
अशी होते चंदन तस्करी
चंदनाच्या झाडांची तस्करी करणारे दिवसा रेकी करून चंदनाची झाडे हेरून ठेवतात. व रात्रीच्या काळोखात झाडांना कापून त्यातील मुख्य गाभा काढून नेतात हा संपूर्ण प्रकार रात्रीच्या काळोखात केला जातो