चांदूरबाजार हादरला! एका रात्रीत १२ शेतकऱ्यांचे नुकसान – बैल, गाई आणि केबल चोऱ्यांनी शिवारात भीतीचे वातावरण

चांदूरबाजार : चांदूरबाजार तालुक्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. थुगाव (पिप्री) व वडुरा शिवारात एकाच रात्री १२ शेतकऱ्यांच्या बोअरवेलवरील केबल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून, वणी बेलखेडा परिसरात बैल जोड्या व गाईंच्या चोरीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
थुगाव : एकाच रात्री १२ शेतकरी लुटले गेले
मंगळवारी रात्री चोरट्यांनी थुगाव (पिप्री), वडुरा शिवारातील शेतकऱ्यांच्या बोअर मशीनवरील केबल्स चोरी केल्या. सुरज अरविंद लंगोटे, मनोज उर्फ भैय्यासाहेब नानासाहेब लंगोटे, मनीष विनायकराव लंगोटे यांच्यासह १२ शेतकऱ्यांना या घटनेचा फटका बसला. या प्रकरणातील तीन तक्रारी चांदूरबाजार पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
वणी बेलखेडा – बैल जोड्या व गाईंची चोरी वाढतेय
याआधी वणी बेलखेडा भागात बैल जोड्या आणि गाई चोरीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे.
चोरांचा नवा डाव – केबल जाळून पुरावे नष्ट
शेतकऱ्यांच्या केबल चोरी केल्यानंतर चोरटे त्या जागेवरच केबल जाळून कॉपर वायर वेगळी करतात, त्यामुळे पोलिसांना कोणताही पुरावा मिळत नाही. परिणामी तपास अंधारातच राहतो.
पोलिसांची भूमिका संशयास्पद – शेतकरी संतप्त
गेल्या 3 ते 6 महिन्यांत चांदूरबाजार तालुक्यातील विविध गावांमध्ये अशा केबल चोरीच्या घटना सतत घडत असूनही आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप शेतकरी करत आहेत. अनेकांनी आता तक्रार देणेच बंद केले आहे.
34 कोटींच्या स्कायवॉक प्रकल्पासारखी सुरक्षा इथे का नाही?
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना, दुसरीकडे पर्यटन प्रकल्पांना संरक्षण देण्यासाठी IIT प्रमाणित चाचण्या व कोटींचा खर्च केला जातो. मग शेतकऱ्यांच्या जीवाशिवाच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष कधी?
भंगार विक्रेत्यांवर संशय – स्थानिक मदतीचा आरोप
चोरट्यांना स्थानिकांचीही मदत मिळत असल्याचा संशय शेतकरी व्यक्त करत आहेत. दिवसा रेकी करून रात्री अंधारात चोरी केली जाते. भंगार विक्रेत्यांकडून तांबे विक्री होत असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, यावर चौकशी व्हावी, अशी मागणी आहे.
शेतकऱ्यांची मागणी – उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
या वाढत्या चोरीप्रकरणांवर तात्काळ कारवाई करून केबल चोरट्यांवर आणि जनावरांच्या चोरीस जबाबदारांवर कठोर कारवाई करावी. स्थानिक पोलिसांना कामगिरीस जबाबदार धरावे, अशी जोरदार मागणी शेतकरी करत आहेत.