महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केली पश्चिम झोन भाजीबाजार प्रभागाची पाहणी

अमरावती : आज दिनांक 23/05/2025 रोजी पश्चिम झोन क्रमांक ५ भाजीबाजार अंतर्गत महानगरपालिका मा.आयुक्त सचिन कलंत्रे व वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव यांनी पार्वती नगर नंबर 1, पार्वती नगर नंबर 2, वल्लभनगर परिसराची पाहणी करून साफसफाई करून घेण्याबाबत सक्त निर्देश देण्यात आले. तसेच सफाईचे काम प्रभागात व्यवस्थित होत नसल्यास दंडात्मक कारवाई करण्याकरिता प्रस्तावित करावे असे निर्देश महानगरपालिका मा. आयुक्त सचिन कलंत्रे यांनी दिले.
सदर भागात काटेकोर स्वच्छता असावी याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देतानाच पावसाळापूर्व कामांमध्ये गटार साफ केल्यानंतर त्यातून काढला जाणारा गाळ उचलून नेण्याच्या आयुक्तांनी सक्त सूचना केल्या. सदर ठिकाणी कचरा उचलण्याची कार्यवाही करण्यात यावी व नागरिक इतरत्र कचरा टाकतांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी मा. आयुक्तांनी दिले. सदर परिसरातील नागरिकांकडून कचरा घंटागाडीद्वारे संकलन करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
यावेळी नाल्यांची आणि गटारांची सफाई केल्याने पाण्याचा योग्य निचरा होतो, ज्यामुळे पूर किंवा पाणी साठण्याची शक्यता कमी होते. कचरा आणि साठलेल्या पाण्यामुळे डास आणि इतर कीटकांची संख्या वाढू शकते, ज्यामुळे अनेक रोगराई पसरण्याची शक्यता असते. साफसफाई केल्याने या समस्या कमी होतात. कचरा आणि घाण साफ केल्याने वातावरण स्वच्छ होते, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. नाल्यांमध्ये आणि गटारांमध्ये साठलेला कचरा आणि गाळ काढून स्वच्छ करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा आणि प्लास्टिक उचलून योग्य ठिकाणी जमा करणे आवश्यक आहे. रस्ते, चौक आणि सार्वजनिक जागा स्वच्छ करणे आवश्यक आहे. नागरिकांना कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि साफसफाईत सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेतील संबंधीत अधिका-यांनी सदर कामात सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक आहे. नागरिकांनीही या कामात सहभागी होऊन आपल्या परिसराची स्वच्छता जपण्यासाठी मदत करावी असे आवाहन महानगरपालिका मा. आयुक्त महोदय यांनी केले.
या पाहणी दरम्यान ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजेश राठोड, स्वास्थ निरीक्षक, बिटप्यून उपस्थित होते.