AmravatiLatest NewsLocal News
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे अभ्यासक्रम समाजासाठी प्रेरक – आयुक्त रविंद्र ठाकरे

अमरावती – समाजातील ज्वलंत प्रश्न, समस्यां आणि अडचणी लक्षात घेता त्यावर परिणामकारक असे विद्यार्थांना शिक्षण मिळणे महत्वाचे आहे. विद्यार्थांच्या कौशल्य विकासाबरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासणे आजच्या काळची गरज असून या गरजेची पूर्तता विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे सातत्याने होत असल्याचे दिसून येते. या विभागातील अभ्यासक्रम समाजासाठी प्रेरक असल्याचे मत अमरावती येथील राज्य माहिती आयुक्त श्री रविंद्र ठाकरे यांनी मांडले. अमरावती येथील राज्य माहिती आयोगाचे आयुक्त म्हणून श्री ठाकरे यांची नियुक्ती झाल्यामुळे स्वागतपर चर्चा करतांना ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अर्थनियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे, डॉ. भगवान फाडके आदी उपस्थित होते.
श्री रविंद्र ठाकरे पुढे म्हणाले, विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे कौतुक करून अशा अभ्यासक्रमांची ज्येष्ठ नागरिकांना तसेच विद्यार्थांना आपल्या शिक्षणाची भूक भागविण्यासाठी हा विभाग अत्यंत गरजेचा आहे. माहिती अधिकाराविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी राज्य माहिती आयोग कार्यालय आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने चांगली भूमिका पार पाडू शकते, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रशासकीय सेवेमध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी काम करतात परंतु प्रत्येक अधिकायाची काम करण्याची पद्धत आणि शैली ही वेगवेगळी असते. आपल्या कार्यप्रतिभेमुळे प्रत्येक नागरिकांना योग्य न्याय मिळावा व आपली सेवा ही जनसेवा असावी अशा लोककल्याणकारी विचाराने पाईक असलेले अधिकारी फारच नगण्य असलेले दिसून येतात. या नगण्य असलेल्या यादीमध्ये समावेश असलेले एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मा.श्री.रविंद्र ठाकरे यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. भारतीय प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त अशा उच्च पदावर कार्य करणारे श्री रविंद्र ठाकरे यांची नुकतीच राज्य माहिती आयोग, मुंंबई यांनी राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली व अमरावतीला राज्य माहिती आयुक्त म्हणून ते रुजू झाले. अमरावती सारख्या समृद्ध शहराला एक प्रामाणिक आणि निष्ठेन कार्य करणारा अधिकारी मिळणं, ही खरोखर गौरवाची बाब असून त्यांच्या निवडीबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. श्री रविंद्र ठाकरे यांच्याशी चर्चा करतांना आजीवन अध्ययन व विस्तार विभागामध्ये सुरु असलेल्या अभ्यासक्रमाची माहिती देत समाजासाठी या अभ्यासक्रमाचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे डॉ. श्रीकांत पाटील यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक नागरिक हा आपले हक्क व अधिकाराविषयी जागृत असला पाहिजे, यामुळे समाज आणखी पारदर्शक बनेल. राज्य माहिती आयोगाद्वारे समाजाला एक दिशा मिळण्यास मदत होत असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.