धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार! नवसाळ फाट्याजवळ भीषण आग

मूर्तिजापूर : गुरुवारी मध्यरात्री ३ वाजता अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक नवसाळ फाट्याजवळ अचानक पेटल्याने राष्ट्रीय महामार्गावर भीषण आग लागली. आगीमुळे महामार्गावर हाहाकार उडाला आणि काही काळ वाहतूक पूर्ण ठप्प झाली.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रकच्या इंजिनातून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच संपूर्ण ट्रक आगीत भस्मसात झाला. अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे गट्टू आणि २० लाखांचा ट्रक पूर्णतः जळून खाक झाला आहे. पेटत्या ट्रकमधून उठलेल्या धुराच्या लोटांनी परिसरात घबराट निर्माण झाली.
प्रशासनाची झोप उडाली, अग्निशमन विलंबात!
घटनास्थळी अग्निशमन दल वेळेवर पोहोचले नसल्याने आग भडकत गेली. यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे. वेळेवर प्रतिसाद मिळाला असता, नुकसान टळले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पोलीस यंत्रणेची तत्परता
घटनेची माहिती मिळताच माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश महाजन आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या प्रयत्नातून आग अखेर नियंत्रणात आणण्यात आली.
सुदैवाने जीवितहानी टळली
या भयावह आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सर्वांत दिलासादायक ठरले. मात्र ही दुर्घटना प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जळजळीत नमुना ठरली आहे.
प्रतिनिधी – मुकेश धोके