अकोल्यात शिवसेना शिंदे गटात फूट, बाजोरिया यांच्याविरोधात पोस्टर जाळले

अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने उरले असताना अकोल्यात शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अकोल्याचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना तात्काळ हटवावे, या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
आज दुपारी अकोला जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या आढावा बैठकीत, कार्यकर्त्यांनी बाजोरिया यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वानुमते निर्णय घेतला की त्यांना पदावरून हटवावे.
या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी शहरातील मध्यवर्ती बस स्टँड चौकात बाजोरिया यांच्या प्रतिकात्मक फोटोंना चपला मारत बॅनर जाळले. यावेळी जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की बाजोरिया यांना पक्षातून बाजूला करण्यात आलं नाही तर निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसेल.
शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितलं की, लवकरच ते राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाजोरिया यांच्याविरोधातील नाराजी थेट त्यांच्या कानावर घालणार आहेत.