देवस्थाना शेजारी साचले घाण पाणी, बडनेरा नालीवर अतिक्रमण, नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा

अमरावती : बडनेरा नवी वस्तीतील हमालपुरा परिसरात भूतोबा देवस्थान शेजारील नालीवर अवैध अतिक्रमण झाल्यामुळे नालीचे पाणी साचून परिसरात घाण व दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू, मलेरिया व अन्य साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे सफाई कामगारांनाही नियमित स्वच्छता करता येत नाही, परिणामी गेल्या एक वर्षांपासून ही नाली साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधीत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी मनपा आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी दिल्या, मात्र प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप नागरिक राजू पवार यांनी केला आहे.
सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्याशी बोलताना राजू पवार म्हणाले की,
“मनपाकडे अनेकदा तक्रारी केल्या, पण कोणतीही कारवाई होत नाही. आमच्या देवस्थानाजवळच घाण साचली आहे. आरोग्यावर परिणाम होतोय. प्रशासनाने जर तात्काळ अतिक्रमण हटवून नाली स्वच्छ केली नाही, तर आम्ही आत्मदहन करू.”