वनस्पतीशास्त्र प्राध्यापकांच्या एकत्रित प्रयत्नातून शिक्षण क्षेत्रात नवचैतन्याचा संचार – कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते
वनस्पतीशास्त्र शिकणे आनंददायी आणि उत्तम करिअर घडविण्यासाठी सक्षम मार्गदर्शक
विद्यार्थी – शिक्षक प्रथम सत्रातच भविष्यातील संधींचा वेध घेणार – डॉ दिनेश खेडकर, अभ्यासमंडळ अध्यक्ष
अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या बहुतांश प्राध्यापकांनी एकत्रित येऊन एक अभूतपूर्व प्रयोग केला असून विषय शिकविण्याच्या पद्धतींवर आधारित विशेष मार्गदर्शिकेचे निर्माण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र सारख्या जिवंत आणि मानवाच्या जीवनाला अधिक समृद्ध आणि संपन्न करणाऱ्या ज्ञानशाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढविण्यासाठी प्राध्यापकांनी केलेला हा प्रयत्न अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. विद्यार्थ्यांना शिकण्याचा आणि प्राध्यापकांना शिकविण्याचा अनुभव आनंददायी आणि कायम स्मरणात राहावा, विषय संकल्पना दैनंदिन आयुष्यातील घडामोडींशी जोडून समजावा आणि मुलभूत संकल्पनांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानात कसा संचार केला ह्या बाबतीत आता वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक त्यांचा विषय विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधारित अभ्यासक्रमात वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी पदवीच्या प्रथम वर्षातच त्याच्या करिअर विषयी इत्यंभूत माहिती घेणार असून उपलब्ध विविध मार्गांविषयी जाणून घेणार आहेत. त्याकरिता पहिल्या सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित दोन महत्त्वपूर्ण पुस्तके तयार करण्यात आलेली आहेत. या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते विद्यापीठात संपन्न झाला. वनस्पतीशास्त्र परिवारातील सदस्यांच्या अथक परिश्रमातून तयार करण्यात आलेली ही पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत:
- फाउंडेशन्स ऑफ प्लांट सायन्स अँड करिअर डेव्हलपमेंट: टूल्स अँड टेक्निक्स फॉर बॉटनी एज्युकेटर्स
- फाउंडेशन्स ऑफ प्लांट सायन्स अँड करिअर डेव्हलपमेंट: अ कॉम्प्रेहेन्सिव्ह गाईड फॉर यूजी बॉटनी स्टुडंट्स
याप्रसंगी पुस्तक निर्मितीच्या संपूर्ण टप्प्यांची माहिती वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिनेश खेडकर यांनी दिली. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या डीबीटी स्टार कॉलेज प्रकल्पाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव थिअरी आणि प्रक्टिकल शिकविण्यासाठी वर्गात अवलंबायच्या एसओपी (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स) तयार करण्यासाठी ऑफलाईन तसेच काही ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आल्या. त्या कार्यशाळांची फलश्रुती म्हणून ६५ हून अधिक प्राध्यापकांनी एकत्रित प्रयत्न करून या पुस्तकांची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावती विद्यापीठांतर्गत मोठ्या संख्येने प्राध्यापकांनी एकत्रितपणे योगदान दिलेल्या या पुस्तकाच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शनासाठी तयार केलेले पुस्तक शिक्षकांसाठी एक सखोल मार्गदर्शक ठरेल. पुस्तकात मांडण्यात आलेल्या वनस्पतिशास्त्राच्या मुलभूत तसेच अत्याधुनिक संकल्पना, तंत्रज्ञानामुळे त्यासंदर्भातील भविष्यातील अपेक्षित घडामोडी, विद्यार्थ्यांना करिअर संधी, शिष्यवृत्ती, फेलोशिप, तसेच इंडस्ट्रीमध्ये लागणारी कौशल्ये या विषयांचा समावेश असून, विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल याची विशेष नोंद करून जेष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ व नामांकित लेखक मानसरोवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. पांडे यांनी पुस्तकासाठी फॉरवर्ड लिहून या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
विमोचन प्रसंगी विचार व्यक्त करतांना माननीय कुलगुरूंनी अशा प्रकारच्या पुस्तक निर्मितीचा अभिनव विचार केल्याबद्दल सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. मोठ्या संख्येने प्राध्यापकांनी एकत्र येणे, सकारात्मक विचार करून अध्यापन पद्धतीवर वैचारिक चर्चा करणे. त्याचे रूपांतर लेखांमध्ये करणे, ग्रामीण भागातील शिक्षकांनी योगदान देऊन या प्रक्रियेत समाविष्ट होणे हे विशेष कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावर अधिक भाष्य करताना सांगितले की, प्राध्यापकांच्या या एकत्रित प्रयत्नातून तयार केलेले पुस्तक अध्यापनातील नाविन्यपूर्ण प्रयोगांचे प्रतीक वाटते. “सर्व अभ्यासमंडळांनी अशी मार्गदर्शक पुस्तके तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहनही कुलगुरूंनी केले. या छोटेखानी विमोचन सोहळ्याचे संचलन डॉ रेखा मग्गीरवार यांनी केले तर आभार डॉ मंगेश डगवाल यांनी व्यक्त केले. यावेळी अभ्यास मंडळातील सन्माननीय सदस्य आणि इतर शिक्षक उपस्थित होते.
“राजकारणाचा ज्वर शिगेला असताना, त्या साऱ्या गोंधळाला बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येणे आणि सकारात्मक कार्य घडवून आणणे हे नक्कीच प्रशंसनीय आहे. शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय आणि जागतिक प्रवाह सातत्याने बदलत आहेत, आणि त्यांचा फक्त स्वीकार करण्यापेक्षा त्यांचा अंगीकार करणे अधिक आवश्यक आहे. या उपक्रमामुळे ज्ञानार्जनाच्या पद्धती अधिक सशक्त बनतील, तसेच शिक्षक-विद्यार्थी नातं अधिक अर्थपूर्ण व विश्वासार्ह होईल, ज्यामुळे शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळेल.” – डॉ. मिलिंद बारहाते, कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
“वनस्पतीशास्त्राचे शिक्षण आनंददायी आणि विद्यार्थ्यांना उत्तम करिअर घडविण्यासाठी सक्षम मार्गदर्शन देणारे ठरावे, यासाठी सर्वच प्राध्यापक सतत प्रयत्नशील आहेत. बदललेल्या अभ्यासक्रमात प्रथम सत्रातच विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींचा वेध घेता येईल. या माध्यमातून शिक्षकांना अध्यापनाची नवीन साधने व तंत्रे शिकण्याची आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची दिशा ठरविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन नक्की मिळणार असा विश्वास आहे.” – डॉ. दिनेश खेडकर, अध्यक्ष, वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ