प्रियकराने केला प्रियसीच्या नवरदेवाचा खून, लग्नाच्या दिवशीच मृतदेह थेट विहिरीत

23 मे रोजी त्याचं लग्न होणार होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण, नातेवाईकांची लगबग आणि तयार्यांचा उधाण… पण नियतीनं आणि सूळाने त्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण काळ्याशार दुःखात बदलला.
21 मे रोजी, धरयूला त्याचा परिचित दयाराम गंजीलाल वरठी (वय 34) फटाके आणण्याच्या बहाण्याने दुचाकीवर घेऊन गेला. पण हे फटाक्यांचे नव्हे, सूळाचे नियोजन होतं. कारण धरयू जिच्याशी लग्न करणार होता, ती मुलगी पूर्वी दयारामची प्रेयसी होती. प्रेम संपलं, पण ईर्षा शिल्लक होती.
दयारामने धरयूला कवठाळ शेतशिवारात नेलं आणि त्याच्यावर दगडाने जबरदस्त हल्ला केला. डोकं आणि गालावर गंभीर जखमा करून त्याचा खून केला. नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला.
धरयू बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आणि शुक्रवारी सायंकाळी मृतदेह विहिरीत आढळून आला. जखमांच्या स्वरूपावरून खुनाचा संशय बळावला आणि पोलिसांनी दयारामला अटक केली.
चौकशीत दयारामने गुन्ह्याची कबुली दिली. तो म्हणाला – “ती माझी होती… आता दुसऱ्याशी लग्न करत होती, म्हणून सूळ घेतला!”
या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विवाहाचं वातावरण थेट अंत्यसंस्कारात बदललं. एक घर लग्नासाठी सजलेलं होतं, तेच आता अश्रूंनी भिजलं.