मान्सूनचा एल्गार, रत्नागिरीतील वादळामुळे विदर्भात पावसाचा मारा

भारताच्या दक्षिण भागात मान्सूनचं आगमन जवळ आलं आहे. हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार २५ मे रोजी, केरळमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कोंकण किनारपट्टीवर सध्या एक वादळ म्हणजेच कमी दाबाचं वादळ सक्रिय झालं आहे. हे वादळ रत्नागिरी आणि दापोलीच्या दरम्यानून पूर्वेकडे भुभागात सरकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे छत्तीसगडपर्यंत एक कमी दाबाचा द्रोणीय पट्टा तयार झाला असून, हवामानात अनेक ठिकाणी अस्थिरता जाणवत आहे. राजस्थान आणि आंध्रप्रदेशावर दीड किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. हेही बदल हवामानात गडबड निर्माण करत आहेत.
विदर्भातील पावसाचा तपशीलवार अंदाजानुसार २४-२६ मे दरम्यान अकोला आणि अमरावती वगळता, विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. तर अकोला आणि अमरावतीत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. २७ मे रोजी अकोला, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील अनेक भागांत गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत आहेत, तर इतर जिल्ह्यांत तुरळक स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे.
२८ मे ला अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली या भागांत मोठ्या प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संभाव्य चित्र अपेक्षित आहे, तर २९ मे रोजी अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत सार्वत्रिक स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आहेत आणि यवतमाळ, वाशीम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली अनेक भागांत पावसाचा प्रभाव जाणवणार आहे.
पूर्व विदर्भात २६ ते २८ मे दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
तसेच, बंगालच्या उपसागरात २७ मे रोजी नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढू शकते, आणि यामुळे विदर्भासह मध्य भारतात पुढील आठवड्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
श्री शिवाजी कृषी विद्यापीठाचे प्रा. अनिल बंड यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, सध्या हवामान विषयक अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत अंदाजावर विश्वास ठेवा.मान्सूनचा एल्गार, रत्नागिरीतील वादळामुळे विदर्भात पावसाचा मारा