प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य डॉ.ने गळफास घेऊन जीवन संपवले, तपोवनमधील जयभोले कॉलनीतील घटना

अमरावती : तपोवन येथील जयभोले कॉलनीत राहणाऱ्या एका 32 वर्षीय उच्चशिक्षित विवाहीत महिलेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार, 25 मे) सकाळी उघडकीस आली. मृतक महिला ही प्राथमिक आरोग्य केंद्रात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदावर कार्यरत होती. आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृतक महिलेचे नाव शुभांगी निलेश तायवाडे (वय 32) असे आहे. त्या सध्या तपोवन परिसरातील जयभोले कॉलनीत आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांच्या पतीचे नाव निलेश तायवाडे असून, ते यवतमाळ जिल्ह्यातील सेंट्रल बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. शुभांगी यांच्या पश्चात दोन चिमुकल्या मुली आहेत.
पतीला आढळून आला मृतदेह
सकाळच्या सुमारास शुभांगी यांनी घरातील बेडरूममध्ये पाळण्याच्या स्लॅब हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सर्वप्रथम त्यांच्या पतीला लक्षात आली. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रम्हा गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा कार्यवाही सुरू केली असून, परिसरात नातेवाईक व नागरिकांची गर्दी जमली होती.
सुसाईड नोट आढळली नाही, पोलिसांचा सखोल तपास सुरू
घटनास्थळी पोलिसांनी घरातील दोन्ही खोल्यांची पाहणी केली असून, सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. शव विच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण समोर येणार आहे.
प्रश्नचिन्हांकित मृत्यू
उच्चशिक्षित व विवाहीत महिला असूनही त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्यामागे काय कारण होते, यावर सध्या परिसरात चर्चेला उधाण आले आहे. शुभांगी तायवाडे या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर होत्या, त्यामुळे त्यांचे सामाजिक व कौटुंबिक जीवन सुरळीत होते का, याचाही तपास पोलिस करत आहेत.
गाडगेनगर पोलीस ठाणे या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून, घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.