महेंद्र कॉलनी आणि विलास नगरमध्ये दररोज वीज गायब! त्रस्त नागरिकांनी MSEB कार्यालयावर केली तोडफोड

अमरावती : लक्ष्मीनगर प्रभागातील महेंद्र कॉलनी, विलास नगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज रात्री वीज खंडित होत आहे. आधीच उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांचा संयम अखेर सुटला. शनिवारी रात्री विजेचा तासन्तास बंद असलेल्या पुरवठ्यामुळे संतप्त नागरिकांनी लक्ष्मीनगर येथील MSEB तक्रार कार्यालयावर धडक दिली आणि रोषात येऊन कार्यालयात तोडफोड केली.
दररोजच्या विजेच्या खंडिततेने सामान्यांचे हाल
महेंद्र कॉलनी व विलास नगर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वीज खंडितता ही नागरिकांसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. रात्री ९ वाजेपासून ते थेट मध्यरात्र १.३० वाजेपर्यंत विजेचा पुरवठा पूर्णतः बंद होता. अनेक घरांतील विद्युत उपकरणे बिघडली असून, अन्नपदार्थ खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत.
MSEB कार्यालयात कोणीच हजर नव्हते
शनिवारी रात्री नागरिकांनी संतप्त होऊन MSEB कार्यालय गाठले. मात्र तिथे एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे नागरिकांचा संताप अधिक वाढला आणि त्यांनी अचानक कार्यालयात तोडफोड केली. दरम्यान, गाडगेनगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
फोनवरून ‘सीटी इंजिनीअर’ची मध्यस्थी
नागरिकांच्या मागणीनंतर पोलिसांनी तातडीने महावितरणच्या सीटी इंजिनिअरशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासात विजेचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र नागरिकांनी पूर्ण रात्र ही विजेविना काढावी लागली.
व्यापारी क्षेत्रही अंधारात, आर्थिक नुकसान
फक्त लक्ष्मीनगरच नव्हे तर राजकमल कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व्यापारी क्षेत्रातही दिवसातून अनेक वेळा वीज खंडित होत आहे. कमी-जास्त व्होल्टेजमुळे उपकरणे बंद पडत आहेत. सततच्या विजेच्या तांत्रिक बिघाडामुळे व्यापार्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तक्रार केल्यावरही कोणतेही समाधान मिळत नसल्याची व्यापाऱ्यांची तक्रार आहे.
निवडणुका जवळ, लोकप्रतिनिधींना वेळ नाही
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी प्रचाराच्या तयारीत व्यस्त असून, नागरी समस्या सोडवण्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, आता जेव्हा त्रास होतो, तेव्हा कोणीही ऐकत नाही; पण निवडणूक आली की विजेचा मुद्दा घेऊन मतं मागायला येणार!