येवद्यात ‘सिंदूर तिरंगा सन्मान यात्रा’, ऑपरेशन सिंदूरच्या शौर्यगाथेला दिली मानवंदना

दर्यापूर : येवदा भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर तालुक्यातील येवदा गावात शनिवारी (ता.२५) एक अभूतपूर्व ‘सिंदूर तिरंगा सन्मान यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेला गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून, गावात संपूर्ण देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रध्वजाच्या साक्षीने कृतज्ञतेचा जागर
यात्रेची सुरुवात गांधी चौक, येवदा येथून सायंकाळी करण्यात आली. या यात्रेत नागरिक, महिला, तरुणवर्ग, लहान मुले, तसेच सेवानिवृत्त माजी सैनिक यांनी उत्साहात सहभाग घेतला. प्रत्येकाच्या हातात तिरंगा, चेहऱ्यावर देशासाठी अभिमान, तर घोषणांनी संपूर्ण गावात देशप्रेमाची ऊर्जा संचारली.
जय जवान, जय किसान ते शहीद जवान अमर रहे!
रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय जवान जय किसान’, ‘शहीद जवान अमर रहे’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. रॅली मारुती महाराज देवस्थान, धोमणपुरा, रामनगर, पेठपुरा, माळीपुरा, वडतकरपुरा मार्गे पुन्हा गांधी चौकात समारोपाला आली.
माजी सैनिकांचे गणवेशातील उपस्थितीने मान वाढवली
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक देखील गणवेश परिधान करून रॅलीत सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीने नागरिकांचे मनोबल उंचावले.
गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी आयोजन
या यात्रेचे आयोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असून गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत रॅली यशस्वी केली. शिस्तबद्ध रचना, एकीचा प्रत्यय आणि राष्ट्रनिष्ठेची प्रचिती यातून येवदा गावाने देशप्रेमाचे उदाहरण सादर केले आहे.