मनपा स्वच्छता मोहिमेचे पितळ उघडे, मालवीय चौकातील नाल्यात काचराच कचरा

अमरावती : मान्सूनपूर्व नालेसफाईचा गजर दरवर्षी मोठ्या उत्साहात केला जातो. शहरातील मोठ्या नाल्यांसोबत लहान नाल्यांचीही स्वच्छता केली जाते, असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वारंवार केला जातो. मात्र, मालवीय चौकातील लहान नाला यंदाही ‘कचऱ्याने डच्च’ भरल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
कागदावरील मोहिम, जमिनीवर कचऱ्याचा डोंगर!
रेल्वे स्टेशनपासून इर्विन रुग्णालयापर्यंत वाहत येणारा नाला मालवीय चौकात येईपर्यंत पूर्णपणे कचऱ्याने तुंबलेला आहे. येथे महिन्यांपासून कचरा व गाळ न काढल्याने रस्त्याखालील अंडर बायपास पूर्णपणे ‘चोकअप’ झाला आहे. प्रथमच पावसातच घाण पाणी रस्त्यावर साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विक्रेते आणि स्थानिक नागरिकांकडूनही कचऱ्याची भर
या नाल्यात केवळ सांडपाणीच नाही तर आजूबाजूच्या विक्रेत्यांकडून सुद्धा थेट कचरा टाकला जातो, त्यामुळे हा नाला पूर्णपणे साचलेला आहे. यामुळं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून, पाणी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वच्छता निरीक्षक आणि ठेकेदार कुठे आहेत?
लहान नाल्यांच्या साफसफाईचे काम प्रभाग आरोग्य निरीक्षक व कंत्राटदारांच्या माध्यमातून केले जाते. पण मालवीय चौकातील स्थिती पाहता, हे काम केवळ कागदावरच झाले असावे, असेच चित्र दिसून येते.
आयुक्त कलंत्रे यांचे लक्ष आहे का?
मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कार्यवाही करावी, अशी सिटी न्यूजच्या वतीने जोरदार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, पहिल्याच पावसात संपूर्ण मालवीय चौक जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.