विजेच्या धक्क्याने गर्भवती म्हैस ठार, नांदगाव खंडेश्वराच्या शेतकऱ्याचे 1 लाखाचे नुकसान

नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील छोरिया नगर 2 लगतच्या ले-आउट भागात शनिवारी (दि. २४) दुपारी तीनच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. चारा खात असलेल्या गर्भवती म्हशीचा विजेच्या पोलास झालेल्या स्पर्शामुळे जागीच मृत्यू झाला.
म्हैस मालक अब्दुल रफिक यांचे मोठे नुकसान
चांदपुरा येथील अब्दुल रफिक यांची म्हैस ही ८ महिन्यांची गर्भवती होती. रोजप्रमाणे ते म्हशीला चारा खाण्यासाठी लेआउट भागात घेऊन गेले असता, ती चारा खात असताना तिचा विजेच्या पोलाला स्पर्श झाला. त्या धक्क्यातच म्हशीचा जागीच मृत्यू झाला.
रफिक यांनी सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले असून, महावितरण कंपनीने नैतिक जबाबदारी स्वीकारून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मोठा अनर्थ टळला
या परिसरातील प्लॉटवर अनेक लहान मुले क्रिकेट खेळत असतात. सुदैवाने त्यांचा संपर्क या पोलाशी झाला नाही, अन्यथा मोठा मानवी अनर्थ ओढवला असता. म्हशीच्या मृत्यूनं एक जीव गेला असला, तरी संभाव्य अपघात टळल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला.
महावितरणवर संताप
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी तातडीने विद्युत पोलांची तपासणी करून परिसरातील वीजप्रवाह सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.