मेळघाटातील स्वयंसेवी संस्थांसोबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद
अमरावती, दि. 29 (जिमाका) : मेळघाट विकास समन्वय समिती, आरोग्य सेवा अमरावती व महिला बाल कल्याण विभाग यांच्या सोबत माता मृत्यू व बाल मृत्यू या विषयावर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी संवाद साधून आवश्यक उपाययोजनेबाबत चर्चा केली. धारणी तालुक्यातील कुसुमकोट खु. येथे उपस्थित डॉ. आरती कुलवाल, डॉ. सुरेश असोले, सहा प्रकल्प अधिकारी धारणी श्री. ठोंबरे, जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. रमेश बनसोड, डॉ. तिलोत्तमा वानखडे, वनिता शिंदे, श्री. पिंजरकर यावेळी उपस्थित होते.
आरोग्य विभागासह एनजीओ व आयसीडीएस विभाग तसेच गावातील नागरिकांचा सहभाग यात महत्त्वपूर्ण आहे.यामुळे माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ज्या गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, पावसाळयात गावांचा संपर्क तुटतो, रोजगार उपलब्ध नसल्यामुळे लोकांचे स्थलांतराचे प्रमाण मोठया प्रमाणात आहेत, भुमका पडीयार अंधश्रध्दा यांच्यावर लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे, कमी वयात लग्नाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने कुपोषित बालके आहेत त्याकरिता उपाययोजना करण्यात यावी.
जेथे संतती प्रतिबंधात्मक वापरचे प्रमाण कमी आहे, दोन अपत्यामधील अंतरचे प्रमाण कमी आहे, मातामध्ये अॅनिमियाचे प्रमाण जास्त आहे, गरोदर माता व स्तनदा माता नियमित आयर्न फॉलिक गोळयांचे सेवन करीत नाही अशा ठिकाणी अति दुर्गम भागात आरोग्य सहायक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांची भूमिका महत्त्वाची आहे. घरी होणा-या प्रसुती तसेच दुर्गम आदिवासी भागात लोक संदर्भ सेवा घेण्यासाठी तयार होत नाही, यासाठी ग्रामसेवक, सरपंच व तलाठी यांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. गावातील उकरडे, गटारे, नळदुरुस्तीसाठी आरोग्य सेवक वगळता ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा प्रकल्प अधिकारी कार्यालय उपाययोजना करण्यात याव्यात. मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण या बाबींवर तसेच या अनुषंगाने विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.