धारणी नगरपंचायतीचा लाईट प्रकल्प अंधारात! कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड, नागरिक संतप्त

धारणी : धारणी नगरपंचायतच्या अखत्यारित करण्यात आलेल्या सोलर लाईट, स्ट्रीट लाईट व डिव्हायडर लाईट प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील धारणी शहरातील बहुतांश लाईट बंद अवस्थेत आहेत किंवा निकृष्ट दर्जाचे असल्याने पहिल्याच पावसात हे लाईट उडून गेल्याची घटना समोर आली आहे.
नगरपंचायतीकडून लाईटसाठी अनेक वेळा ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली. अद्यापपर्यंत पाच ते सहा वेगवेगळ्या ठेकेदारांनी सोलर लाईट प्रकल्प हाती घेतले असतानाही प्रत्यक्षात केवळ खांब उभे करण्यात आले, तर सोलर प्लेट लावण्याचे काम पूर्णच झालेले नाही. मात्र, या अपूर्ण कामांचेही संपूर्ण बिल नगरपंचायतीने मंजूर करून ठेकेदारांना दिल्याची माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सगळ्या व्यवहारात नगरपंचायतीला ‘कमीशन’ही मिळाल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जात आहे.
जिल्हा अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष?
असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि बेजबाबदार कारभार समोर येत असूनही जिल्हा प्रशासन व वरीष्ठ अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याची टीका नागरिक करत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अधिकारी हे कमीशनच्या मोहात गप्प असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
अंधारात रस्ते, धोक्यात नागरीक
या निकृष्ट लाईटमुळे संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी संपूर्ण धारणी शहर अंधारात बुडालेले असते. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
नागरिकांचा संताप उफाळून आला
सदर प्रकारामुळे धारणी शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. नगरपंचायतच्या भ्रष्ट कारभाराचा जाब विचारण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिक संघटनांकडून दिला जात आहे.