भानखेडा मोगऱ्यात पावसाचा कहर; आयटीआयसह गावालाही फटका
भानखेड : मंगळवार, २७ मे रोजी दुपारी आलेल्या संततधार पावसाने भानखेड मोगरा येथील नालंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये मोठे नुकसान केले आहे. जोरदार वाऱ्यांसह आलेल्या या पावसामुळे संस्थेच्या इमारतीचे टीने छप्पर उडून गेले, वर्गखोलीत पाणी साचले, संगणक भिजले, तर धावपळीत दोन शिक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.
व्हेरिफिकेशनमुळे विद्यार्थ्यांचा बचाव
दुपारी सुरू असलेल्या वर्गात अनेक विद्यार्थी उपस्थित होते, मात्र त्याचवेळी चालू असलेल्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेच्या निमित्ताने दुसऱ्या खोलीत हलवण्यात आले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि विद्यार्थ्यांचा जीव वाचला.
वादळी पावसामुळे गावातही नुकसान
पावसामुळे गावातील रस्त्यावरील वीज खांब कोसळले असून, काही मोठे वृक्षही जमीनदोस्त झाले आहेत. वर्गखोलीत पाणी शिरल्याने संगणक व इतर शैक्षणिक साहित्य भिजून नुकसान झाले आहे. या घटनेदरम्यान शुभम ठाकरे व मनोज अनभोरे हे दोन शिक्षक धावपळीत किरकोळ जखमी झाले आहेत.
पंचनाम्याची प्रक्रिया सुरू
२८ मे रोजी दुपारी संस्थेतील नुकसानाचे सारवासारव काम तातडीने कामगारांच्या साहाय्याने हाती घेण्यात आले. यासोबतच तलाठी अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. संपूर्ण भानखेड परिसरातील पावसामुळे झालेल्या इतर नुकसानीचाही आढावा घेण्यात आला आहे.