बंद झालेल्या HTBT कापूस बियाण्यांची मोठी तस्करी उघड!

अकोला : राज्य सरकार व संशोधन संस्थांकडून HTBT कापूस बियाण्यांना परवानगी नसतानाही, अकोल्याच्या मूर्तिजापूर शहर पोलीसांनी राष्ट्रीय महामार्ग ५३ वर मोठी कारवाई करत बोगस बियाण्यांची तस्करी उघडकीस आणली. एका खाजगी लक्झरी बसमधून दुसऱ्या वाहनात हे बियाण्याचे पोते भरताना ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत HTBT कंपनीचे १७ पोते बोगस कापूस बियाणे जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १५ ते २० लाख रुपये असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
कारवाई कशी झाली?
गुजरातच्या सुरतवरून अमरावतीकडे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसमधून एक काळ्या रंगाची वॅगनार गाडी बियाण्याची पोती भरत होती. व्यास हॉटेलजवळ गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या पथकाने ही हालचाल पाहताच तत्काळ कारवाई करत संशयितांची चौकशी केली.
तपासात उघडकीस आले की, सदर बियाणे देशभरात बंदी असलेल्या HTBT कंपनीचे असून, त्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात होती.
कृषी विभागाची उपस्थिती आणि पुष्टी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधून घटनास्थळी बोलावले. कृषी अधिकाऱ्यांनीही या बियाण्यांची बंदी असलेली असल्याची पुष्टी केली.
पोलिसांची भूमिका संशयास्पद?
या संपूर्ण घटनेतील पोलिसांची भूमिका संपूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात आहे.
फक्त एकच आरोपी अटकेत दाखवण्यात आला
फक्त एक Tata वाहन (MH-20-AT-8048) जप्तीमध्ये दाखवले
प्रत्यक्षात वापरलेली काळ्या रंगाची वॅगनार कार मात्र पोलीसांनी मुक्त केली
तसेच, या कारमध्ये उपस्थित असलेला चालक माध्यमांसमोर सर्व हकीकत उघड करत असतानाही, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक मात्र ‘मज्जा’ करताना दिसले, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.