रुई ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवकावर गंभीर आरोप; अभियंत्यावरही कारवाईची मागणी
माहुर नांदेड : श्री क्षेत्र माहूर तालुक्यातील रुई येथे सरपंच लता गणेश राऊत यांच्या अध्यक्षतेत शुक्रवार दि. 30 मे रोजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली.या ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवक अशोक दत्ता मानतुटे हे घरकुलाचे बिल काढण्यासाठी आपल्याकडून पैसे उकळतात,अशी तक्रार अनेक घरकुल लाभार्थ्यांनी केली.त्यासंदर्भात धारेवर धरले असता, ग्राम रोजगार सेवक मानतुटे यांनी घरकुल लाभार्थ्यांकडून गोळा केलेले पैसे अभियंता श्रीरामे यांना दिले, असा लिखित खुलासा केला.सदरचा ठराव एकमुखाने मंजूर झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
रुई ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत रमेश शेळके,सुभाष पिंपळे, संजय मानतुटे, गयाबाई अंकुर, पंडित मानतुटे, शारदा काळबांडे, काशिनाथ चांदणे, रुखमिनी आगिरकर व कविता मुरखे या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बिल काढण्यासाठी ग्राम रोजगार सेवक अशोक मानतुटे यांनी वारंवार पैसे उकळले,असा लेखी व तोंडी आरोप केला. त्यावरून मानतुटे यांनी घरकुल लाभार्थ्यांनी बिल काढण्यासाठी जमा केलेले पैसे आपण अभियंता श्रीरामे यांना दिल्याचा लेखी जवाब दिला.या प्रकरणी अभियंता श्रीरामे व रोजगार सेवक मानतुटे या दोघांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करणारा ठराव एकमुखाने मंजूर करून पुढील कार्यवाही करिता पं. स. कार्यालयात पाठविण्यात आला. ग्रामसभेला भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, नागोराव सुर्वे ,संजय सापेकर, गुमानसिंह चुंगडे,गजानन मानतुटे, उत्तमराव सुकळकर,परसराम भोयर (पो. पा.), तानाजी केशवे, गणेश राऊत यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
प्रतिनिधी :- गोपाल चव्हाण