श्रीकांत व तुषार भारतीय यांच्या मातोश्री ताराबाई भारतीय यांचे निधन, अंत्यविधीस राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिति

अमरावती : भाजपा आमदार श्रीकांत भारतीय व तुषार भारतीय यांच्या मातोश्री सौ. ताराबाई पंडितराव भारतीय यांचे शुक्रवार, दिनांक 30 मे रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय कुटुंबावर शोककळा पसरली असून, शहराच्या राजकीय-सामाजिक वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवार, दिनांक 31 मे रोजी कृष्णाअर्पण कॉलनी, अमरावती येथील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर हिंदू स्मशानभूमी येथे धार्मिक विधीनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. चितेला मुखाग्नी देत कुटुंबीयांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या अंत्यविधीस शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः, आमदार संजय खोडके, आमदार रवी राणा, आमदार प्रवीण तायडे, आमदार चंदू यावलकर यांच्यासह अनेक नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून भारतीय कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले.
ताराबाई भारतीय यांचं संपूर्ण जीवन साधेपणा, कुटुंबवत्सलता आणि समाजशीलतेचा आदर्श होता. त्यांच्या स्मृतीला मानाचा मुजरा देत अनेकांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या.
सिटी न्यूज अमरावती परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.