अमरावतीत श्री महेश नवमी महोत्सवाचा भव्य शुभारंभ, नवीन माहेश्वरी भवनाचे लोकार्पण

अमरावती : श्री माहेश्वरी पंचायततर्फे आयोजित चार दिवसीय श्री महेश नवमी महोत्सव आज उत्साहात सुरू झाला असून, या महोत्सवाचा प्रारंभ धनराज लेन येथील नवीन माहेश्वरी भवनाच्या लोकार्पणाने झाला.
या लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून बृजलाल बियाणी संस्थेचे अध्यक्ष ओम प्रकाश लढ्ढा यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांच्यासह छत्तीसगड सरकारचे माजी अधिवक्ता अॅड. जुगल किशोर गिलडा, श्री माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष जगदीश कलंत्री आणि उपाध्यक्ष सुरेश साबू यांच्यासह अनेक मान्यवरांचा उपस्थितीत हा सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान महेश यांच्या विधिवत पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर समाजातील लहान बालकलाकारांनी गणेश वंदना नृत्य सादर करून वातावरण भक्तिमय केले. या सोहळ्याला माहेश्वरी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या सुमित गौरीशंकर हेडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सुमित हेडा यांनी मंचावरून समाजाचे आभार मानले.
तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. आमदार संजय खोडके, आ. सौ. सुलभा खोडके आणि माजी महापौर विलास इंगोले यांचा श्री माहेश्वरी पंचायततर्फे विशेष सन्मान करण्यात आला. नवीन इमारतीच्या उभारणीत मोलाची मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे व समाजसेवकांचेही आभार मानण्यात आले.
सुरेश साबू, उपाध्यक्ष, श्री माहेश्वरी पंचायत यांनी सांगितले की,
“या नव्या भवनाच्या माध्यमातून समाजाचे सामूहिक कार्य अधिक सशक्त होईल. हा सोहळा समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरला आहे.”
हा लोकार्पण सोहळा केवळ इमारतीचे उद्घाटन न राहता, समाजाच्या संघटनात्मक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक ठरला आहे.