जिल्हा स्वीप कक्ष व फटाका असोसिएशनमार्फत मतदार जनजागृती
अमरावती, दि. 30 (जिमाका): जिल्हा स्वीप कक्ष व फटाका असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदानावर मतदान जनजागृती उपक्रम नुकताच राबविण्यात आला. तसेच जिंगल्सव्दारे मतदान जनजागृती करण्यात आली. फटाका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना यावेळी खरेदीत विशेष सुट मिळणार आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, सामान्य प्रशासन अधिकारी संजय राठी,प्रशासन अधिकारी राहुल पवार, चिल्लर फटाका विक्रेते सचिव राजाभाऊ उंबरकर, जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, नितिन माहोरे, श्रीकांत मेश्राम, हेमंतकुमार यावले, राजेश सावरकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली.
जिल्हा स्वीप कक्षाव्दारे आगामी काळात विविध जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा, सर्व सामाजिक, व्यापारी, औद्योगीक, शैक्षणिक संघटना इत्यादीच्या सहभागाने व महानगर पालिका तथा क्रीडा विभागाच्या सहकार्याने जवळपास 50 हजार नागरिकांची मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात येणार आहे. सर्व विधानसभा मतदार संघाअंतर्गत मतदान जनजागृती संदर्भात तालुका स्वीप नोडल अधिकारी व चमूमार्फत विविध उपक्रम, मतदान जनजागृती उपक्रम, महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व बचत गटातील महिला यांचा पिंक फोर्स तयार करुन गृह भेटीव्दारे महिला मतदारांमध्ये जनजागृती करणे या बाबींचा समावेश आहे.