LIVE STREAM

India NewsLatest News

इस्रायलचा इराणवर हल्ला : इराणच्या २० वरिष्ठ कमांडरसह ७८ जणांचा मृत्यू, ३२९ जखमी

तेहरान : इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’अंतर्गत २०० लढाऊ विमानांच्या सहाय्याने इराणच्या आण्विक व लष्करी तळांवर शुक्रवारी सकाळी आणि रात्री जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या सैन्य दलाच्या २० वरिष्ठ कमांडरसह ७८ जण ठार झाले, तर ३२९ जण जखमी झाले.

शुक्रवारी दुपारी इराणने इस्रायलच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना १०० हून अधिक ड्रोन डागले. मात्र, हे सर्व ड्रोन पाडण्यात आले. यातील एकही ड्रोन इस्रायलपर्यंत पोहचला नाही, असा दावा इस्रायली सैन्याने केला.

मुकाटपणे अणुकरार करा, अन्यथा मोठा हल्ला करू – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला की, इराणने अणुकरारावर मुकाटपणे स्वाक्षऱ्या कराव्यात, अन्यथा त्यांच्यावर आणखी मोठा हल्ला होऊ शकेल. इराणने अणुकरार न केल्याने त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. सर्व काही संपण्याच्या अगोदर इराणने हा करार करावा, असे ट्रम्प म्हणाले. आम्ही इराणला ६० दिवसांचा वेळ दिला होता, आज ६१ वा दिवस आहे. काय करायचे ते मी सांगितले होते, पण त्यांनी ते केले नाही. आता त्यांच्याकडे दुसरी संधी आहे.

इराणच्या ‘इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’चे (आयआरजीसी) कमांडर हुसैन सलामी यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तसेच इराणचे दोन अणुशास्त्रज्ञ मोहम्मद मेहदी तेहरांची आणि फरदून अब्बासी हेही ठार झाले. इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी यांचाही मृत्यू झाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे सल्लागार अली शमखानी हे इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

इस्रायलने दावा केला की, इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व काही ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ हल्ल्यात मारले गेले आहेत.

इस्रायलच्या हवाई दलाने इराणच्या नतांझ येथील सर्वात मोठ्या भूमिगत युरेनियम सुविधा केंद्रावर हल्ला केला. या केंद्राचा बहुतांशी भाग जमिनीच्या खाली आहे. या केंद्राचे हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. येथे युरेनियम शुद्ध करणाऱ्या मशिन्स व अन्य तांत्रिक यंत्रणा होत्या.इस्रायलने हल्ल्यापूर्वी इराणमध्ये पाठवली शस्त्रास्त्रे

इस्रायली अधिकाऱ्यांनी खुलासा केला की, हवाई हल्ल्यापूर्वीच शस्त्रास्त्र व ड्रोन इराणमध्ये पाठवण्यात आले होते. आमच्या हवाई हल्ल्यानंतर आम्ही या शस्त्रास्त्रांद्वारे अंतर्गत हल्लेही केले.

अमेरिकेसोबतची चर्चा बंद – इराण

हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेसोबतची आण्विक करार करण्याबाबतची चर्चा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, आक्रमक व डिवचणाऱ्या कृत्यानंतर चर्चेला कोणताही आधार राहत नाही.

इस्रायलला पश्चात्ताप होईल – पजशकियान

इराणचे राष्ट्रपती मसूद पजशकियान यांनी सांगितले की, इस्रायलने इराणच्या लष्करी व आण्विक स्थळांवर हल्ले करून मोठी चूक केली आहे. आता त्यांना त्याचा मोठा पश्चात्ताप होईल. इराण आता गप्प बसणार नाही.

इराणच्या भूमिगत नतांझ युरेनियम सुविधा केंद्राचे नुकसान

इराणचा ‘आयआरजीसी’चा कमांडर हुसेन सलामी हल्ल्यात ठार

इराणचे दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञ, मोहम्मद मेहदी तेहरानची आणि फरदून अब्बासी यांचाही मृत्यू

इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बघेरी, इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार

‘रेव्होल्यूशनरी गार्ड्स एरोस्पेस’ कमांडर मेजर जनरल अमिराली हाजीजादेह यांचाही मृत्यू

इस्रायलचे हल्ले ही युद्धाची घोषणा – इराण

इराणच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, इस्रायलचा आमच्या सैन्य व आण्विक तळांवरील हल्ला ही युद्धाची घोषणा आहे. याप्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने कारवाई करावी, अशी मागणी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पत्र लिहून केली आहे.

इस्रायलला धडा शिकवणार – खामेनी

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी म्हणाले की, आमचे सैन्य दल इस्रायलला शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाही.

नेत्यानाहूंचा मोदींना फोन

तेल अवीव : इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून चर्चा केली.

नेत्यानाहू यांनी मोदींना पश्चिम आशियातील निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. त्यावर मोदी यांनी सांगितले की, मी त्यांना भारताच्या चिंताबाबत अवगत केले. या क्षेत्रात शांतता व स्थिरता तत्काळ निर्माण होणे गरजेचे आहे. भारताने सांगितले की, इराण-इस्रायलच्या संघर्षामुळे आम्ही चिंतेत आहोत. यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर आमची बारीक नजर आहे. दोन्ही देशांनी तणाव वाढेल असे पाऊल उचलू नये, असे भारताने सांगितले.

कच्च्या तेलाचे दर १० टक्क्यांनी उसळले

नवी दिल्ली : इराण व इस्रायल संघर्षामुळे जगात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. कच्च्या तेलाचे दर १० टक्क्यांनी उसळले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाच्या प्रति पिंपाचे दर ४.७८ डॉलरने वाढून ७४.१५ डॉलरवर पोहचले. त्याचा मोठा फटका जगाला बसणार आहे.

इराण हा जगातील सर्वात मोठा तेल पुरवठादार देश आहे. इराणजवळ होर्मुजची सामुद्रधुनी आहे. जगातील २० टक्के तेलाचा व्यापार या सामुद्रधुनीतून चालतो. इराणने रागाच्या भरात हा मार्ग बंद केल्यास जगातील तेलाचा पुरवठा थांबू शकतो. या भीतीने तेलाच्या दरात वाढ झाली. भारत हा आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के तेल आयात करतो. कच्चे तेल महाग झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढू शकतात. त्यामुळे वाहतूक, खाण्या-पिण्याच्या वस्तू, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू शकतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!