LIVE STREAM

Latest NewsNagpur

गडचिरोलीतील दुर्गम भागातील १२० विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’कडे स्वप्नवत उड्डाण

गडचिरोली/नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विशेष उपक्रमांतर्गत सिरोंचा, वांगेपल्ली (अहेरी) आणि नवेगाव (गडचिरोली) येथील निवासी शाळांमधील १२० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बंगळूरूच्या ‘इस्रो’ (ISRO) केंद्राकडे उड्डाण केलं आहे.

अनेक विद्यार्थ्यांसाठी हा पहिलाच विमानप्रवास होता. विशेष म्हणजे, यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी याआधी रेल्वेगाडीही पाहिलेली नव्हती, एवढंच काय, काहींनी तर गडचिरोलीचे मुख्यालयसुद्धा याआधी पाहिले नव्हते.

मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणादायी संवाद
या ऐतिहासिक प्रवासाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी विचारले, “कुठे चाललाय प्रवास? काय बघणार आहात?” अशा आपुलकीने विचारपूस करत, “मुलांनो, खूप अभ्यास करा आणि यशस्वी व्हा,” असा दिलासादायक सल्लाही दिला.

आदिवासी विकास मंत्री व अन्य मान्यवरांची उपस्थिती
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारीही नागपूर विमानतळावर उपस्थित होते.

संकल्पनेतून कृतीकडे – डॉ. सचिन मडावी यांची पुढाकार
या प्रेरणादायी उपक्रमाची संकल्पना सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) डॉ. सचिन मडावी यांची आहे. जिल्हाधिकारी पंडा यांच्या तातडीच्या मान्यतेनंतर, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी निधी उपलब्ध करून दिला.

विद्यार्थ्यांना गडचिरोलीहून बसद्वारे नागपूर विमानतळावर आणण्यात आले. हिरवी झेंडी दाखवून त्यांच्या विमानप्रवासाची सुरुवात करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रकल्प अधिकारी चेतन हीवंज यांची यावेळी उपस्थिती होती.

पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
विद्यार्थ्यांच्या स्वप्नवत प्रवासाचा क्षण पाहताना पालकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. शिक्षणाच्या माध्यमातून दुर्गम भागातील मुलांनाही अंतराळ संशोधनासारख्या क्षेत्राची ओळख होण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.

इस्रो म्हणजे काय?
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची राष्ट्रीय अवकाश संस्था असून, उपग्रह, रॉकेट, अवकाशवाहन आणि वैज्ञानिक संशोधनात आघाडीवर आहे. विद्यार्थ्यांचा इस्रो भेटीचा अनुभव अवकाश विज्ञानाच्या प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!