सिंहगडावर ‘जय शिवराय’चा गजर: शिवराज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न.
पुणे : जय भवानी, जय शिवराय… छत्रपती संभाजी महाराज की जय चा जयघोष, पारंपरिक वाद्यांचा गजर, आणि पुष्पवृष्टीने नटलेली पालखी… अशा भक्तिमय आणि उत्साहवर्धक वातावरणात किल्ले सिंहगडावर श्री शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार थाटात साजरा करण्यात आला.
विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला शेकडो शिवभक्तांनी उपस्थित राहून सिंहगडावर शिवप्रेम व्यक्त केले.
विराट दुचाकी रॅलीने सोहळ्याला प्रारंभ
सोहळ्याची सुरुवात छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून विराट दुचाकी रॅलीने झाली. या रॅलीने विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे मार्गे सिंहगड पायथा गाठला. त्यानंतर पालखी मिरवणूक वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे समाधीपर्यंत पार पडली.
पालखी मिरवणूक व शिवमूर्ती अभिषेक
पालखी मिरवणुकीत हलगी, शंखनाद, ढोल-ताशा पथकांसह भगवे झेंडे घेऊन शिवभक्तांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक, नरवीर तानाजी मालुसरे समाधीचे पूजन आणि सिंहगडावरील मंदिरे तसेच ऐतिहासिक स्थळांचे पूजन करण्यात आले.
शिवेंद्रराजे भोसले आणि आयोजकांची प्रेरणादायी भाषणे
सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन करत उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले.
“राज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन म्हणून प्रत्येक गडावर साजरा झाला पाहिजे,” असे ते म्हणाले. गड स्वच्छता व वृक्षारोपणाचे उपक्रम हे सामाजिक भान निर्माण करणारे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले, “शिवराज्याभिषेक हा हिंदू स्वाभिमान पुनरुज्जीवनाचा क्षण आहे. त्यामुळे प्रत्येक गड-किल्ल्यावर हा दिवस साजरा व्हायला हवा.”
महाप्रसादाने समारोप
सिंहगड पायथ्याजवळ महाप्रसादाचे आयोजन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या संपूर्ण अभिवादन सोहळ्याचे हे आठवे यशस्वी वर्ष ठरले.