लोकसभेला तह केला, पण विधानसभेला पुरंदरमध्ये विजय शिवतारेंविरोधात अजितदादा गटाचा उमेदवार रिंगणात
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याविरोधात जोरदार रान उठवून नंतर माघार घेतलेल्या विजय शिवतारे यांना विधानसभा निवडणुकीत पु्न्हा धक्का बसला आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात समेट झाला होता. त्यावेळी विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बारामतीमधून लढण्याचा निर्णय मागे घेतला होता. परंतु, आता विधानसभेला त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाजी झेंडे यांनी पुरंदर विधानसभेतून विजय शिवतारे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.
विजय शिवतारे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवार ही अर्ज दाखल केलेला आहे. तर संभाजी झेंडे यांनी महायुतीतीलच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे आता माघारीचा प्रश्नच येत नाही. मी माझ्या पद्धतीने लढेन, ते त्यांच्या पद्धतीने लढतील. मात्र, यामधून महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होणार नसून ते त्यांच्या पद्धतीने आणि मी माझ्या पद्धतीने निवडणूक लढणार असल्याचं संभाजी झेंडे यांनी स्पष्ट केले. मात्र, आता पुरंदर मध्ये दोघांपैकी एकाने माघार घेतली नाही तर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, अशी चिन्हं दिसत आहेत. तर महाविकास आघाडी कडून संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात शिवतारेंनी दंड थोपटले
लोकसभा निवडणुकीच्यावेळी विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याचा निश्चय केला होता. मला बारामतीमधील पवार घराण्याविरोधातील मतं मिळू शकतात, त्याआधारे मी जिंकेन, असा दावा विजय शिवतारे यांनी केला होता. विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मोठे राजकीय वैर होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्या पराभवासाठी विशेष कष्ट घेतले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला विजय शिवतारे हे अजितदादांविरोधात दंड थोपटून उभे राहिले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनंतर विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेत सुनेत्रा पवार यांना मदत करण्याचे कबूल केले होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल 35 हजारांचे मताधिक्य मिळाले होते.