श्रीनिवास वनगा तब्बल 4 दिवसानंतर घरी परतले; म्हणाले, एकनाथ शिंदे विश्वासू, पण त्या लोकांना सोडणार नाही!
नॉट रिचेबल असलेले शिवसेना शिंदे गटाचे पालघर विधानसभेचे विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा तब्बल चार दिवसानंतर घरी परतले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा मागील चार दिवसांपासून नॉट रिचेबल होते. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा तलासरीतील कवाडे येथील त्यांच्या राहत्या घरी परतले.
घरी पुन्हा आल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या चेहऱ्यावर नाराजी, राग, दुःख दिसून येत आहे. चार दिवसांनंतर घरी परतल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पुन्हा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. षडयंत्र करून माझं तिकीट कापलं गेलं. पद असलं नसलं तरी, मी काम करत राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला विश्वासू वाटतात, पण त्यांच्या जवळची लोकं त्यांना मिस गाईड करतात, अशी नाराजी श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली.
श्रीनिवास वनगा नेमकं काय म्हणाले?
100 तासांपेक्षा अधिक वेळ नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा आज आपल्या घरी परतले असून ज्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच राहणार, असंही ते म्हणाले. शेवटपर्यंत मला आश्वासन देण्यात आली. मात्र माझं तिकीट रद्द करून उमेदवारी आयात उमेदवाराला दिली. मात्र माझी काय चूक होती?, मी लोकांची काम सातत्याने करत आहे. तरीही माझ्यावर हा अन्याय केला गेला, हे पूर्ण षडयंत्र होतं. माझं शंभूराजे देसाई यांच्याबरोबर बोलणंही झाला आहे तेही प्रामाणिक आहेत. प्रामाणिकपणाचे फळ असं मिळतं का?, असा सवाल श्रीनिवास वनगा यांनी उपस्तित केला.
षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही- श्रीनिवास वनगा
मी जिद्दी आहे, प्रामाणिक आहे आणि पुढे माझ्या सामाजिक कामातून हे मी या षडयंत्र रचणाऱ्यांना दाखवून देईल. मी त्यांना सोडणार नाही. माझं काम मी कायमस्वरूपी करत राहील. मला भविष्य आहे. मी भावनेच्या भरात काही बोललो गेलो असेल. मला बरंही वाटत नव्हतं आणि माझ्या मित्रांनी मला खूप सांभाळलं. परंतु माझा मुलगा आजारी होता असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे शेवटी आज मी घरी आलो. माझा परिवार आहे त्यांचीही मला काळजी आहे. परंतु अशा प्रामाणिक लोकांवर अन्याय होऊ नये असं मला वाटतं. असं मत श्रीनिवास वनगा यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले.