कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी स्वीकारला एल.आय.टी. नागपूरच्या कुलगुरू पदाचा पदभारमहाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपतींकडून निवड
महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांची नागपूर येथील लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल (एल.आय.टी.) विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड केली. सदर निवड ही सहा महिने किंवा नियमित कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्या कालावधीकरिता करण्यात आली आहे.
प्रभारी कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी आज नागपूर येथील लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल (एल.आय.टी.) विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार मावळते कुलगुरू डॉ. राजू मानकर यांचेकडून स्वीकारला. यावेळी डॉ. राजू मानकर व कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कुलगुरूंवर अभिनंदनाचा वर्षाव
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांची महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल (एल.आय.टी.) विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड केल्याबद्दल त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे, उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम, कुलगुरूंचे स्वीय सहाय्यक श्री रमेश जाधव यांनी नागपूर येथे कुलगुरूंचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. याशिवाय विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींचे सदस्य, संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांनी डॉ. बारहाते यांचे अभिनंदन केले आहे.
विद्यापीठाचा नावलौकिक वाढविण्यावर भर
लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल (एल.आय.टी.) विद्यापीठ कायदा 2023 नुसार स्थापन झालेल्या विद्यापीठाचा नावलौकिक वाढविण्यावर माझा भर राहणार आहे. मध्य भारतातील नागपूर येथे असलेल्या या विद्यापीठात नवनवीन संशोधन, तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला जाणार असून येथील विद्यार्थी जागतिक दर्जाचा कसा तयार होईल, यावर सुद्धा माझा भर राहील.