विधानसभा निवडणुकीत 100 टक्के वोटर स्लिप देणार -जिल्हाधिकारी सौरभ कटियार
*बीएलओंची तक्रार आल्यास कारवाई
अमरावती : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदारचिठ्ठ्या प्रभावी माध्यम ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत संपूर्ण मतदारांना वोटर स्लिप देण्यात येणार आहे. याबाबत सूचना देण्यात आल्या असून येत्या दोन दिवसात मतदारचिठ्ठीचे वाटप करण्यात येणार आहे. यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, मतदारांना मतदानाआधी मतदान चिठ्ठी मिळाल्यास त्यांना आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे, याची माहिती मिळण्यास मदत होते. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी गेल्यास त्यांना मतदानाची आवाहनही करणे शक्य आहे. प्रामुख्याने शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्या भागात कमी मतदान झाले आहे, त्याच भागात प्रभावीपणे जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावे. या भागावर लक्ष केंद्रीत केल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. निवडणुकीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी आहे. या कालावधीत बहुसंख्य मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य आहे. महानगरपालिका क्षेत्रात मतदार जनजागृतीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केली.
मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रामुख्याने पाणी आणि परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घेण्यात यावी. मतदान केंद्राबाबत प्रामुख्याने शहरी भागातून तक्रारी जादा प्रमाणात येतात. त्यामुळे याठिकाणी जादा लक्ष देण्यात यावे. प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीवेळी आलेल्या तक्रारी परत होणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत. मतदान केंद्रांची नियमितपणे तपासणी करावी. याठिकाणी काही समस्या असल्यास त्या तातडीने दूर कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.