सौदार्हपूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडावी *निवडणूक निरीक्षकांच्या सूचना
अमरावती : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार अंतिम झालेले आहेत. त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून प्रचाराला सुरूवात होणार आहे. उमेदवारांना सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाने ठेवावी, तसेच उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून ही निवडणूक सौदार्हपूर्ण वातावरणात पार पाडावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी आलेल्या निरीक्षकांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह सामान्य निवडणूक निरीक्षक श्यामलाल पुनिया, बिहान चंद्र चौधरी, पोलिस निरीक्षक बत्तुला गंगाधर, खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावत, डॉ. उमा माहेश्वरी आदी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांना विविध सूचना दिल्या. उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आल्याने आजपासून प्रचार सुरू होणार आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी एक खिडकीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तातडीने सर्व परवानगी मिळण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी फिरते आणि स्थिर पथक निर्माण करण्यात आले आहे. ही पथक कार्यरत असल्याची खात्री करण्यात यावी. त्यांच्यामार्फत जप्तीच्या कारवाई करण्यात याव्यात. तसेच याठिकाणीचे कॅमेरे आणि वीज पुरवठा सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना दिल्या.
उमेदवारांनी त्यांचा प्रचार करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उमेदवारांनी वैयक्तिक टिका-टिप्पणी टाळावी. तक्रार करण्याआधी सत्यता पडताळून पाहावी. याबाबत राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिनिधींनाही सूचना द्याव्यात. जिल्ह्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार याची दक्षता सर्वांनी घ्यावी. नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्या आल्यास त्याबाबत तातडीने कार्यवाही करून त्या निराकरणासाठी प्रयत्न करावेत. उमेदवारांच्या खर्चाबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी. खर्च पथकांनी दर्शविलेला खर्च आणि उमेदवारांचा खर्च यांची जुळवणी होणे आवश्यक आहे.
निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पाडावी. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींना तातडीने ओळखपत्र देण्यात यावे. त्यांना मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात यावी. तसेच उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतची माहिती देण्याच्या सूचनाही निरीक्षकांनी यावेळी दिल्या