निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विभागीय मदत केंद्र स्थापन मदतीसाठी 0721-2662062 संपर्क क्रमांक जाहीर
अमरावती, दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय पातळीवर स्वतंत्र मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिली आहे. मतदान पथकांना येणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी 0721-2662062 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला असून संबंधितांनी यावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी कर्तव्यनिष्ठ कर्मचारी अभियानांतर्गत या मदत कक्षाची विभागीय पातळीवर विभागीय आयुक्त कार्यालयात स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक समस्या, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, परिवहन व्यवस्था इत्यादी अनुषंगिक बाबींवर निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण या मदत कक्षाव्दारे करण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत 24 तास हा मदत कक्ष कार्यरत राहणार आहे. याची नोंद निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.