अमरावतीच्या ‘शशांक साव’ची चित्रपटसृष्टीत भरारी कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ” झुंझारपूर ” चित्रपट प्रदर्शित होणार
अमरावती : चित्रपटाच्या क्षेत्रातील स्पर्धेत आता मराठी माणूसही मागे नाही. विशेषत: ग्रामीण भागात सुध्दा अनेक कलागुणांनी संपन्न मुलंमुली असल्याचे बरीचशी उदाहरणं आपण पहातो. आता अमरावतीच्या ‘शशांक साव’ या युवकाने नुकतेच “झुंझारपूर” हा मराठी चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शित केला. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाची निर्मिती म्हणजे त्याने चित्रपटसृष्टीत घेतलेली भरारीच आहे असे म्हटले जात आहे.
शंशाकने निर्मित व दिग्दर्शित केलेल्या ‘झुंझारपूर’ या चित्रपटाचा प्रिमियर शो कोलकाता येथे 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर होत आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या माहिती व सांस्कृतिक विभाग यांच्याद्वारे कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतो. नॅशनल कॉम्पिटेशन ॲन्ड ऑल लॅंग्वेजेस या सेक्शन मार्फत हा ‘झुंझारपूर’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. देशातून केवळ 12 चित्रपट या स्पर्धेसाठी निवडले जातात. त्यात शंशाक साव निर्मित व दिग्दर्शित “झुंझारपूर”ची निवड झाली असून अमरावती जिल्ह्यासाठी ही भूषणावह बाब आहे. शंशाकच्या या यशाबद्दल चित्रपटसृष्टी, कला क्षेत्रासह सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.