जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी

अमरावती, दि. 22 : विधानसभा निवडणुकीसाठी लोकशाही भवनात मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतमोजणी केंद्राला भेट देऊन आवश्यक असलेल्या तयारीची पाहणी केली.
मतमोजणी केंद्राला त्री-स्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करण्यात आला आहे. तसेच शस्त्राचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.
लोकशाही भवनात मतमोजणी होणार असल्यामुळे बियाणी चौक ते विद्यापीठ रस्यासेवरील वाहतूक रस्ता वळविण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल इतर संपर्क साधनांच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रांजिस्टर, कॅलक्युलेटर आदी प्रकारच्या साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटरचा परिसर हा पादचारी क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या परिसरात निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कारवाई करण्यात येणार आहे,