अधिवेशनापूर्वी बनतेय पुरुष आमदारांसाठी स्वतंत्र ‘डायनिंग रूम’

राज्यातील सरकार अजून स्थापन झाले नसले तरी हिवाळी अधिवेशनाची तयारी मात्र जोरात सुरू आहे. आमदार निवासात दुरुस्तीसह इतर कामे सुरू आहेत. यातच येथील कॅन्टीनमध्ये महिला आमदारांप्रमाणे पुरुष आमदारांसाठीसुद्धा स्वतंत्र अशी डायनिंगची व्यवस्था केली जात आहे.
अधिवेशनाच्या काळात आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बरीच गर्दी असते. त्यामुळे महिला आमदारांनी कॅन्टीनमध्येच स्वतंत्र डायनिंगची व्यवस्था करायची मागणी केली होती. त्यांची मागणी योग्य होती. त्यानुसार महिला आमदारांसाठी तशी स्वतंत्र डायनिंगची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे एकाच वेळी आठ महिला आमदार बसून जेवण करू शकतील, अशी ती सुविधा आहे. दुसरीकडे पुरुष आमदारांसाठी अशी स्वतंत्र व्यवस्था नव्हती. कॅन्टीनमध्ये त्यांना इतरांसोबत बसूनच जेवण करावे लागायचे. त्यामुळे मागच्यावर्षीच पुरुष आमदारांनी डायनिंगची स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली होती. तेव्हा पुढच्या अधिवेशनात ही व्यवस्था देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आता तशी व्यवस्था केली जात आहे. कॅन्टीनला लागून असलेल्या जागेवर एका बाजूला पुरुष आमदारांसाठीसुद्धा स्वतंत्र डायनिंगसाठी केबीन तयार केले जात आहे. २० फूट लांब व ८ फूट रुंद हे केबीन पुरुष आमदारांसाठी राहील. यात सोफे लावण्यात येतील. एका वेळी ८ आमदार येथे बसून भोजन करू शकतील.
अधिकाऱ्याच्या प्रेमापोटी नियमांकडे दुर्लक्ष विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीत पीडब्ल्यूडीच्या विभाग एकच्या उपविभाग एकची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाची जबाबदारी सांभाळत असलेल्या अधिकाऱ्याला इतर कुठलाही पदभार दिला जात नाही, असा अघोषित नियम आहे. परंतु, उपविभाग एकच्या एका डेप्युटी इंजिनिअरवर इतके प्रेम आहे की, त्यांच्याकडे सब डिव्हिजन चारचाही प्रभार सोपविण्यात आला आहे. या अतिरिक्त प्रभाराची सध्या पीडब्ल्यूडीमध्ये चर्चा रंगली आहे.