प्लास्टीकपासून / कृत्रिमरित्या बनविलेल्या नायलॉन मांजामुळे पक्षी व मानवास होणाऱ्या इजांबाबत पर्यावरण कायद्याच्या निर्देशाचे पालन करावे

नायलॉन मांजामुळे पक्षी, मानवी जीवावर ‘संक्रांत’
अमरावती,
जानेवारी महिना उजाडला की सर्वांना वेध लागतात ते मकरसंक्रांत या सणाचे. संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. पण अलीकडे हा खेळ जीवघेणा ठरत आहे. पूर्वी पतंग उडवण्यासाठी दोऱ्याचा किंवा घरगुती मांजाचा वापर केला जायचा. आता मात्र पतंग उडवण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा वापर केला जात असल्याने पक्ष्यांबरोबरच मानवी जीवनावरदेखील यामुळे संक्रांत येत आहे. पतंग काटाकाटीच्या खेळात दरवर्षी शेकडो पक्षी बळी पडत असून, नागरिक देखील गंभीर जखमी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.
नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेता दिल्लीत या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. पाठोपाठ महाराष्ट्रातदेखील याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशातही सर्रासपणे या मांजाची विक्री केली जात असल्याने, मकरसंक्रांत या गोडवा निर्माण करणाऱ्या सणाला काहीसे कडवट रूप प्राप्त होत आहे. नायलॉन मांजामुळे आतापर्यंत शेकडो पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहेे. निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अमरावतीमध्ये पक्ष्यांचा मोठा राबता आहे. दरवर्षी विदेशी पक्षी स्थलांतर करीत अमरावतीमध्ये मुक्कामासाठी येतात. याव्यतिरिक्त पक्ष्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती अमरावतीमध्ये आढळून येतात. मात्र, नायलॉन मांजा या पक्ष्यांच्या जीवावर उठत आहे. हा मांजा कुजत किंवा नष्ट होत नसल्याने, वर्षानुवर्षे या मांजाचे दुष्परिणाम पक्ष्यांना भोगावे लागत आहेत. केवळ पक्षीच नाहीत तर मानवी जीवनासाठीदेखील हा मांजा घातक ठरत आहे. या मांजामुळे आतापर्यंत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. काहींना तर मांजामुळे कायमचे अपंगत्व आले आहे. तर काहींचा जीवही गेला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, मांजावर बंदी आणली गेली असली तरी, त्याचा सर्रासपणे वापर केला जात आहे.
मागील काही वर्षांत शहरात काही पक्षी गतप्राण झाले असून काही पक्षी जायबंद झाले आहेत. यामध्ये पोपट, चिमणी, साळुंकी, कावळे, कबूतर, दयाळ, आदींचा समावेश आहे. रात्री भरारी घेणारे गव्हाणी घुबडही यास बळी पडले आहेत. घार, कापशी घार, बगळे, शराटी या पक्ष्यांवर दरवर्षी संक्रांत असते.
शराटी, घुबड, पांढर्या माणेचा करकोचा, राखाडी छातीची पाणकोंबडी, ग्रेट थिकणी, शिक्रा, चिमणी, कबुतर, पोपट, कावळे, साळुंकी, घार आदी पक्षी नायलॉन मांजाच्या जाळ्यात अडकून बळी पडतात.
नायलॉन मांजा, काचेचा मांजा साठा व विक्री करण्यास बंदी असून
राष्ट्रीय हरित लवादाने मांजाचा व्यापार, साठवणूक, विक्री व वापर यावर बंदी घातली आहे. त्यामुळे विविध कायद्यांतर्गत कारवाई करता येते. मात्र, याबाबत शासकीय यंत्रणा व नागरिकांमधे जनजागृती होणे आवश्यक आहे. महानगरपालिकेतर्फे याबाबत प्रयत्न केले जात आहेत.
नायलॉन मांजा न वापरता पतंग उडविण्याचा आनंद घ्यायला हवा. शक्यतो, खुल्या मैदानात पतंगी उडवाव्यात.
नायलाॅन मांजामुळे जखमी पक्ष्यांवर उपचार करणे अवघड असते. अनेक पक्ष्यांना कायमस्वरुपी अपंगत्व येते. त्यामुळे त्यांना आयुष्यभर पिंजऱ्यात किंवा झूमध्ये राहावे लागते. नायलॉन मांजाच्या बंदीची कठोर अंमलबजावणी आणि विद्यार्थांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे असे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांनी सांगितले.
शहरामध्ये पंतगोत्सव / पतंग उडविणेकरीता नायलॉन / प्लास्टिक/कृत्रिम साहित्य वापरुन तयार होणान्या मांजाचा वापर / विक्री प्रतिबंधीत करण्याबाबत निर्देश प्राप्त होते. त्या अनुषंगाने शहरामधील विक्रेत्यांकडून नायलॉन मांजाची विक्री / वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास नायलॉन जप्ती दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही करण्याबाबत विस्तृत आदेश निर्गमित करण्यात आले होते.
विषयांकित प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपुर, येथे सुमो दु जनहित याचीका क्र. ०१/२०२१ दाखल असुन यामध्ये दि. ०६/०१/२०२३ रोजीचे आदेश निर्गमित झाले आहेत. सदरहू आदेशान्वये नायलॉन मांजाचे विकी, वापर यावर प्रतिबंध घालण्याकरीता या संदर्भातील कारवाई अधिक व्यापक करण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत. त्याअन्वये पोलीस, महसुल, स्थानिक स्वराज्य संस्थेचे उच्च अधिकारी यांचा समावेश असलेला टॉस्क फोर्स मा. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गठीत करण्यात येत आहे.
मा. उच्च न्यायालयाचे निर्गमित आदेशानुसार नायलॉन मांजा बाळगणाऱ्या व्यक्तिंविरुध्द ०६ महिन्यापर्यंत शिक्षेसह कमीत कमी १०,०००/- रु. दंडाची तरतुद आहे. तसेच नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री, वाहतुक करणाऱ्याविरुध्द ०३ ते ०५ वर्षापर्यंत शिक्षेसह किमान १,००,०००/- रुपये दंडाची तरतुद आहे.
पतंग उडविण्याकरीता नायलॉन मांजाचा वापर करू नये तसेच शहरातील कोणत्याही विक्रेत्याने नायलॉन मांजाची विक्री करु नये याकरीता उपाययोजना म्हणून, नायलॉन मांजा जप्तीची कार्यवाही करणे, नायलॉन मांजा जप्त करुन अशा आस्थापनांना वर नमुद प्रमाणे दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्याकरीता सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी यांचे नियंत्रणात झोननिहाय जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरिक्षक यांचे पथक यापुर्वीच गठीत करण्यात आले आहे. तथापि मा. उच्च न्यायालयाचे निर्गमित आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये नॉयलॉन मांजा प्रतिबंधीत करण्यासंदर्भातील कारवाई करणेकरीता यापुर्वी निर्गमित करण्यात आलेले सर्व आदेश अधिक्रमित करुन सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
विषयांकित प्रकरणी प्राप्त निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये नायलॉन मांजा, चिनी मांजा किंवा चिनी दोर, नायलॉन (सिंथेटीक) कृत्रिम किंवा बारीक चुरा केलेली काच, धातू किंवा अन्य कोणताही तीक्ष्ण पदार्थ यांनी अवगुंठित केलेला असा कोणताही धागा, यांची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा आणि वापर होत असल्याचे निर्दशनास आल्यास निर्गमित कार्यालयीन सुधारीत आदेशानुसार आवश्यक कार्यवाही करुन मा. राष्ट्रीय हरीत न्यायाधीकरण यांचे प्राप्त निर्देशानुसार प्रतिज्ञालेख / माहिती सादर करण्याच्या अनुषंगाने कार्यपुर्ती अहवाल सादर करण्याचे निर्देश महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांनी दिले आहे