राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आज उद्घाटन
अमरावती, दि. 09 :- क्रीडा व युवक संचालनालय आणि भारतीय क्रीडा शालेय महासंघाच्या वतीने 14 वर्षे मुले, मुलींची 68वी राष्ट्रीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दि. 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता विभागीय क्रीडा संकुलात होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी, संजिता महापात्रा यांच्या हस्ते होणार आहे. आमदार सुलभाताई खोडके अध्यक्षस्थानी राहतील. उद्घाटन कार्यक्रमात प्रकाश मेश्राम गृप, अमरावती इनक्रेडीबल इंडिया सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र गाडे हे रोप मल्लब खेळाचे प्रात्यक्षिक सादर करतील.
त्यानुसार स्पर्धा आयोजन विभागीय उपसंचालक कार्यालय यांनी केले आहे. या स्पर्धा दि. 9 ते 12 डिसेंबर कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील 30 मुलांचे संघ आणि 27 मुलींचे संघ असे 57 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे. यात 420 मुले व 378 मुली खेळाडू असे एकूण 798 खेळाडू, संघ व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे तांत्रिक आयोजन करण्यासाठी 50 पंच आणि सामनाधिकारी एसजीएफआयचे पदाधिकारी स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेतृ सदर राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धाचे सर्व सामने विभागीय क्रीडा संकुलातील इंनडोअर हॉलमध्ये फ्लडलाईटमध्ये होणार आहे.