शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

अमरावती, दि. 9 : सामाजिक न्याय विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यात सुमारे सहा हजार अर्ज महाविद्यालय आणि विद्यार्थीस्तरावर प्रलंबित आहेत. सदर अर्ज तातडीने प्रलंबित काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येतात.यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याकरिता दि. 25 जुलै 2024पासून सुरूवात झाली. सन 2024-25 वर्षाचे दि. 9 डिसेंबर 2024 रोजीच्या महाडीबीटीनुसार जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर शिष्यवृत्तीचे 5 हजार 847 अर्ज, तर विद्यार्थीस्तर 370 अर्ज प्रलंबित आहेत.
महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित मुदतीत जिल्हा कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक आहे.मात्र महाविद्यालयांनी सदर अर्ज मंजुरीसाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत व्हीसी, बैठक व पत्राद्वारे वेळोवेळी अवगत करुनही शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी लॉगिनकडे त्रृटी पूर्ततेकरिता परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रृटीपूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिन दि. 30 डिसेंबर 2024 पर्यंत पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधववर यांनी केले आहे.