संजय मोरे दारु पित नाही, कुर्ला अपघात बस चालकाच्या कुटुंबांचा दावा, पोलिस तपासातही मोठी माहिती
मुंबई: कुर्ला बेस्ट अपघातातील मृतांचा आकडा आता सातवर पोहोचला आहे. जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कुर्ला एलबीएस मार्गावरील मार्केटमध्ये सोमवारी रात्री ही बेस्टची बस भरधाव वेगात शिरली आणि बसने अनेकांना चिरडलं. यामध्ये रात्रीपर्यंत पाच जणांचा मृत्यू झालेला होता. तर आता हा आकडा वाढून सात झाला आहे. तर जखमींची सख्या २९ वर पोहोचली आहे. ३३२ क्रमांकाची ही बेस्टची इलेक्ट्रिक बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला.
अपघातावेळी बसमध्ये ६० प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफचे जवानही जखमी झाल्यातची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी बस चालत संजय मोरेला अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस चालक संजय मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा फारसा अनुभव नव्हता, अशी माहिती आता समोर आली आहे. दहा दिवसांपासून तो इलेक्ट्रिक बस चालवत होता. अनुभव नसताना त्याच्या हाती ही बस देणारे अधिकारी कोण, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
१ डिसेंबरला संजय मोरेची नियुक्ती झाली होती. त्याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नसताना त्याला ही बस चालवायला दिली गेली. त्याने फक्त १० दिवसांचं ट्रेनिंग घेतलं होतं. यापूर्वी तो खाजगी बस चालवायचा. संजय मोरे लॉकडाऊननंतर बेस्टमध्ये कंत्राटी बसचालक म्हणून कामाला लागला होता.
वैद्यकीय चाचणीत संजय मोरेने मद्यप्राशन केलं नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. दुसरीकडे, या बसमध्येही कुठला बिघाड नसल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे नेमका हा अपघात कसा घडला याचा तपास सध्या सुरु आहे.
संजय मोरेला दारुचं व्यसन नव्हतं, त्याने कधीही दारु प्यायली नाही, कुटुंबीयांची प्रतिक्रिया
याबाबत आता संजय मोरेच्या कुटुंबीयांचीही प्रतिक्रिया पुढे आली आहे. संजय मोरे कधीही दारु पित नसल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. कदाचित बसमध्येच तांत्रिक बिघाड असावा असा अंदाजही कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.