इस्रायलने एकाचवेळी शेकडो हल्ले केल्यानंतर आता कशी आहे सिरियामधली परिस्थिती ?

सीरियाचे अध्यक्ष परागंदा झाल्याचा फायदा घेत इस्रायलच्या लढाऊ विमानांनी राजधानी दमास्कस आणि इतर शेकडो ठिकाणी हल्ले केले असल्याचं स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीतून समजत आहे. सीरियातल्या सैन्याच्या ताफ्यांवर हे हल्ले झाले असल्याचं ब्रिटन स्थित सीरियन ऑबझर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स (एसओएचआर) या संस्थेनं म्हटलंय.
तसेच सीरियाच्या नौदलाच्या तळांवर हल्ले केल्याची कबुली इस्रायलने दिली आहे. त्याचबरोबर इस्रायलच्या लष्कराने हे देखील मान्य केले आहे की सीरियात 350 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. सीरियातल्या रासायनिक शस्त्रांच्या निर्मितीशी संबंध असणाऱ्या, काही संशोधन केंद्रावरही हे हल्ले करण्यात आले असल्याचं स्थानिक वृत्तसंस्था सांगतायत.
सीरियाचे अध्यक्ष बशर-अल-असद यांच्या त्रासाला कंटाळून बंडखोरांनी सत्तापालट घडवून आणला. या बंडखोरांच्या हाती, ही रासायनिक शस्त्रे पडू नयेत म्हणून आपण हे पाऊल उचललं असल्याचं इस्रायलने म्हटलंय. सोमवारी बशर असद परागंदा झाल्यानंतर सीरियातल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठकही भरवण्यात आली होती. सीरियाबद्दलचं त्यांचं अधिकृत वक्तव्य लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचं परिषदेनं म्हटलं.
“सीरियाची भौगोलिक एकात्मता आणि नागरिकांची सुरक्षा जपण्याची आणि गरजूंना मानवहितकारी मदत पोहोचवण्याची गरज असल्याबद्दल परिषदेतील सर्वांचंच थोड्याफार प्रमाणात एकमत झालं,” संयुक्त राष्ट्र संघातले रशियाचे प्रतिनिधी वॅसिली नेबेझिया पत्रकारांशी बोलताना म्हणाले.