LIVE STREAM

Latest NewsMaharashtra PoliticsNagpur

BJP लागला 2029 च्या तयारीला ! एकट्याने 200+ जागा जिंकण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ‘या’ व्यक्तीकडे

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज दुपारी चार वाजता नागपूरमधील राजभवनामध्ये नव्या मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने एक मोठी खेळी केली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2029 साली 200 हून अधिक जागा जिंकण्याचा मानस बोलून दाखवला होता. त्याच भाजपाने ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय म्हणजे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. भाजपाने ज्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं आहे त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचाही समावेश आहे. मात्र बावनकुळेंकडे मंत्रिपद सोपवण्यात आल्यास त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात येणार आहे. ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार हे सुद्धा भाजपाने निश्चित केलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तियावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणाकडे सोपवण्यात येणार ही जबाबदारी ?

अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद हे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. 2029 साली भाजपाने शतप्रतिशत भाजपा म्हणजेच स्वबळावर सत्तेत येण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीनेच ही नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2029 मध्ये एकट्या भाजपाचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्याचं उद्दीष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री असतानाच त्यांचे निकटवर्तीय असलेल्या रविंद्र चव्हाणांवर भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. रविंद्र चव्हाण हे एक उत्तम संघटक म्हणून पक्षात ओळखले जातात. तसेच फडणवीस यांच्याकडून पडद्यामागे होणाऱ्या अनेक हलचालींमध्ये रविंद्र चव्हाणांचा सक्रीय सहभाग असतो असं सांगितलं जातं.

नव्या प्रदेशाध्यक्षांचा अल्पपरिचय :-

रविंद्र चव्हाण यांचा जन्म 20 सप्टेंबर 1970 साली कल्याण येथे झाला. ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून 2009, 2014, 2019 आणि आता 2024 असे सलग चार टर्म निवडून आले आहेत. रविंद्र चव्हाण यांनी यापूर्वी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. 2022 साली स्थापन झालेल्या, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री राहिले. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आली होती. मात्र आता प्रत्यक्ष मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी न देता पक्ष संघटना अधिक मजबूतपणे बांधण्याची जबाबदारी रविंद्र चव्हाणांच्या खांद्यावर सोपवण्यात येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!