राष्ट्रवादीच्या इतिहासात पहिल्यांदाच वळसे पाटलांवर आली वेळ, अजित पवारांनी मंत्रिपद का नाकारलं ?

नागपूर :- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात छगन भुजबळांसह आणखी एका ज्येष्ठ नेत्याला संधी मिळाली नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत दिलीप वळसे पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेत आहे आणि वळसे-पाटील मंत्री नाहीत हे पहिल्यांदाच झालं असावं. शरद पवारांचा हुशार विद्यार्थी असा नावलौकिक असलेल्या वळसेंना शरद पवारांनी सत्तेत आल्यावर कायम मंत्री केलं. अजित पवारांनी पक्षातून बंड केलं त्यावेळी वळसे पाटील त्यांच्यासोबत होते. अजित पवारांसोबत त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण, यंदा त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही.
दिलीप वळसे पाटील सलग आठ वेळा पुणे जिल्ह्यातील आंबेगावातून आमदार झाले आहेत. ते 1990 पासून आजपर्यंत विधानसभा सदस्य आहेत. गृह, अर्थ, उर्जा अशी महत्त्वाची मंत्रिपद त्यांनी भूषवली आहेत. एवढं सगळं असूनही वळसे पाटलांना मंत्रिपद नाकारण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.
काय आहे कारण?
वळसे पाटलांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही, असं कारण सांगितलं जातंय. त्यांना मंत्रिपदापासून दूर का ठेवण्यात आलं, याबद्दलही बऱ्याच चर्चा आहेत.आंबेगाववर 35 वर्ष वर्चस्व असलेल्या दिलीप वळसे पाटलांचं मताधिक्य यंदा लक्षणीय घटलं. 2019 च्या निवडणुकीत 60 हजार मतांच्या फरकानं निवडून आलेले वळसे पाटील यंदा अवघ्या दीड हजार मतांनी निवडून आले. त्यांच्या वेगवेगळ्या कारणांनिमित्त शरद पवारांशीही भेटीगाठी सुरू होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवं नेतृत्व तयार करण्याची अजित पवारांची स्ट्रॅटेजी आहे.तालुक्यात नवं नेतृत्व तयार करण्यासाठीच यंदाच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील यांना संधी देण्याचा पक्षाचा विचार होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय झालेल्या शरद पवारांनी आंबेगावमध्ये वादळी सभा घेतली. गद्दाराला पाडाच, असं आवाहन पवारांनी केलं होतं. त्यामुळे रिस्क नको, असा विचार करत पुन्हा वळसे पाटलांनाच तिकीट देण्यात आले.
आता दिलीप वळसे पाटील यापुढे पक्ष सांगेल ते काम करणार आहेत. त्याप्रमाणे ते लवकरच मुलगी पूर्वा वळसे पाटील यांच्याकडे राजकीय वारसा सोपवण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे.