अधिवेशन संपवून अजित पवार बीडमध्ये दाखल

बीड :- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेला 13 दिवस उलटून गेले आहेत. संतोष यांच्या तेराव्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड मध्ये गेले आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाइंडला सोडणार नाही. दोषींना शिक्षा दिली जाईल, असेही आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. अधिवेशन संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ही घटना फार वेदनादायी, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. संतोष यांच्या हत्येची न्यायालयामार्फत तसेच कुणाचाही दबाव येऊ नये, यासाठी आय जी लेव्हलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फतही चौकशी करत आहोत, वेळ पडल्यास तुम्हाला पोलिस बंदोबस्त देऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायला आपण तयार असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणालेत.