तर ठाकरे बंधू एकत्र येण्याचं स्वागतच करेन, शेलारांचा मनमोकळेपणा, राज ठाकरेंच्या कानात उद्धव म्हणाले…

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेपक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे रविवारी बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले. ही भेट कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त असली, तरी ठाकरे बंधूंमध्ये खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका दोघे एकत्र लढण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. मात्र भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार, शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे दावे केले आहेत.
निमित्त काय ?
राज ठाकरे यांची सख्खी बहीण जयजयवंती यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या विवाहानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. इतकंच नव्हे, तर एकमेकांशी गप्पा मारतानाही दिसले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसले. मनसे आणि ठाकरे गटाचे समर्थक दोघं एकत्र येण्याचं ‘सुखचित्र’ पाहण्यासाठी आसुसलेले आहेत. अशावेळी राजकीय पटलावरही दोघं एकत्र येणार का, याची चर्चा आहे.
तर स्वागतच करेन – शेलार
कुठल्याही लग्न सोहळ्यात, नातेवाईकांमध्ये परिवारातील लोकांनी एकत्र येणं ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी तर सांस्कृतिक कार्य खात्याचा मंत्री आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रातील किंवा मराठी माणसाच्या संस्कृतीप्रमाणे लग्न किंवा सोहळ्या ठाकरे बंधू एकत्र आले, तर त्याचं मी स्वागतच करेन, अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.
एकत्र येण्याची शक्यता नाही – शिवसेना
दरम्यान, शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी या चर्चा उडवून लावल्या. ‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका लग्नात भेटल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याचे कारण नाही. जर उद्धव ठाकरेंसोबत यायचंच असतं, तर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी गेले असते. राज ठाकरेंनी अनेकदा टाळी मागण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्धव ठाकरेंनी नेहमीच हात मागे घेतला. हे दोघे भाऊ एकत्र येतील असे मला वाटत नाही, निदान इतक्यात तरी नाही’ असे शिरसाट म्हणाले.