LIVE STREAM

AmravatiLatest NewsMaharashtra

करीना थापाला राष्ट्रपतींच्या हस्ते `प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

अमरावती, दि.२६ :- प्राण पणाला लावून कठोरा भागातील जय अंबा अपार्टमेंटच्या 70 कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या करिना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात एका शानदार कार्यक्रमात “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले.

“वीर बाल दिना”च्या औचित्याने केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित या कार्यक्रमास विभागाच्या मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि सचिव अनिल मलिक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणी मध्ये देशातील १७ बालकांना “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा”ने गौरविण्यात आले.पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

समयसूचकता व धाडसाच्या जोरावर करिनाने सिलेंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला व भीषण अपघातातून अपार्टमेंटचे रक्षण केले.

शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान- तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि संशोधन क्षेत्रामध्ये कतृत्वाची छाप सोडणाऱ्या भारतातील मुला-मुलींची विविध निकषांच्या आधारे या पुरस्कारासाठी निवड केली जाते.शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावरसिंह आणि साहिबजादा फतेहसिंह यांनी देशासाठी दिलेल्या प्राणांच्या आहुतीचे स्मरण म्हणून 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिनाच्या औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024 च्या सायंकाळी 6.00 वाजता ही दुर्घटना घडली. घरकाम करणाऱ्या करीना थापाने बंद असलेल्या शेजारच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, आग आणि धुराचे लोट येत असतानाही पाण्याच्या बादल्यांचा सतत मारा करत तीने सिलेंडर शेजारील आग पूर्णपणे आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढले.अशात सिलेंडरचा स्फोट कधीही होऊ शकला असता. करीनाच्या समय सूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व अपार्टमेंटचे रक्षण झाले.

या सर्व घटनाक्रमात धाडस व समयसूचकतेचा परिचय देणाऱ्या करिनाच्या या अनन्यसाधारण कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला.सर्व निकषांती प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!