कोठारी ज्वेलर्समध्ये खोट्या चेकसह फसवणूक

नागपूर :- कोठारी ज्वेलर्समध्ये एका व्यक्तीने नितीन गडकरी यांचे चीफ सेक्रेटरी असल्याचा दावा करत सोन्याची खरेदी केली आणि खोटा चेक देऊन 2,57,000/- रुपयांची फसवणूक केली. संबंधित व्यक्तीने दुकानात येऊन दोन सोन्याच्या चेन खरेदी केल्या आणि सदर रकमेचा चेक दिला. दुकानाच्या मालकाने चेक स्वीकारण्यास नकार दिला, परंतु सहसंचालकाने फोनवरून चेक स्वीकारण्यास होकार दिला आणि संबंधित व्यक्ती दागिने खरेदी करून निघून गेला.
मात्र, थोड्या वेळाने नागपूरच्या सोनारांच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक मेसेज आला, एक व्यक्ती नितीन गडकरी यांचे चीफ सेक्रेटरी असल्याचा खोटा दावा करून खोटे चेक देवून फसवणूक करत असलयाची माहिती दिली. या माहितीवरून कोठारी ज्वेलर्सने तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली. तपासात, आरोपीचे नाव राजवीर चावला असे निष्पन्न झाले असून, तो दिल्लीचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
आरोपी भाड्याने गाडी घेऊन नितीन गडकरी यांचे चीफ सेक्रेटरी असल्याचा खोटा दावा करत खोटे चेक देऊन फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे, घडलेल्या अपराधाची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली.अंबाझरी पोलीस स्टेशनने संबंधित तक्रारीची नोंद घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.